नवी दिल्ली: शिंदे सरकारच्या भवितव्यावरील सुनावणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. कारण संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांच्या पात्रतेवरील सुनावणीचा सुप्रीम कोर्टाच्या उद्याच्या कामकाजात अद्याप समावेश नाही. त्यामुळे महाराष्ट्र सरकारच्या दृष्टीने महत्त्वाची सुनावणी उद्या होणार की नाही याबद्दल अद्यापही अनिश्चितता आहे.
या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती जे. बी. पारडीवाला यांच्या सुटीकालीन खंडपीठाने 11 जुलै रोजी सुनावणी निश्चित केली होती. पण आता सर्वोच्च न्यायालयाची सुट्टी संपून नियमित कामकाज सोमवारपासून सुरू होत आहे.
सरन्यायाधीश रामण्णा यांच्या अध्यक्षतेखालील त्रिसदस्यीय पीठाची कार्यसूची रविवारी जाहीर करण्यात आली. त्यात या याचिकांचा सुनावणीसाठी समावेश नाही. या याचिका अन्य कोणत्याही खंडपीठाकडे वर्गही करण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे त्यासंदर्भात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता नाही, असे सूत्रांनी सांगितले.