नवी दिल्ली: केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज नवी दिल्ली येथे 6व्या ‘खाणी आणि खनिजांवरील राष्ट्रीय परिषदेत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला केंद्रीय खाण, कोळसा आणि संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी आणि केंद्रीय खाण, कोळसा आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
देशाच्या आर्थिक विकासात खाणी, खनिजे आणि कोळसा क्षेत्राचे मोठे योगदान आहे. खाणी आणि खनिजांसाठी योग्य धोरणांशिवाय कोणत्याही देशाच्या विकासाची कल्पना करता येत नाही, असे प्रतिपादन अमित शाह यांनी यावेळी केले. सध्याच्या सरकारने अमलात आणलेल्या सुधारणांमुळे कोळसा खाणी वाटपात खोलवर रुतून असलेला भ्रष्टाचार समूळ नष्ट केला आहे, असे शाह म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खाण क्षेत्रात सुधारणांना सर्वोच्च प्राधान्य दिले आहे.केंद्र सरकारने या मध्ये पारदर्शकता आणली, या क्षेत्रातले अडथळे दूर केले,आणि अनेक बाजूनी हे खाजगी क्षेत्रासाठी खुले केल्याचे त्यांनी सांगितले. पर्यटन आणि हवाई क्षेत्रानंतर सर्वात मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती करणारे क्षेत्र म्हणून खाण आणि खनिज क्षेत्राचे नाव असल्याचे त्यांनी सांगितले.