द्रौपदी मुर्मू या आता भारताच्या १५व्या आणि दुसऱ्या महिला राष्ट्रपती ठरल्या आहेत. शिवाय, पहिल्या आदिवासी समाजातील महिला राष्ट्रपती म्हणूनही त्यांना सन्मान मिळाला आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत एनडीए पुरस्कृत उमेदवार द्रौपदी मुर्मू यांचा विजय झाला असून यूपीए पुरस्कृत उमेदवार यशवंत सिन्हा यांचा पराभव झाला आहे. दरम्यान, या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्रौपदी मुर्मू यांची भेट घेत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
“मुर्मू यांनी मंत्री तसेच आमदार म्हणून चांगली कामगिरी केलेली आहे. झारखंडच्या राज्यपाल असताना त्यांनी आपली जबाबदारी उत्तमरित्या पार पाडली होती. राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतरही त्या देशविकासाच्या प्रवासात देशाचे नेतृत्व करतील, याचा मला विश्वास आहे,” असे ट्विट नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
तसेच त्यांनी द्रौपदी मुर्मू यांना मत देणाऱ्या सर्व खासदार आणि आमदारांचे आभार मानले आहेत. द्रौपदी मुर्मू यांची नरेंद्र मोदी यांनी भेट घेत त्यांचं अभिनंदन केलं आहे.