नागपूर: ३० जुन २०२२ रोजी एकनाथ शिंदे यांनी महारष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. उप- मुख्यमंत्रीपद हे देवेंद्र फडणवीस यांना मिळालं होत. पण जवळजवळ एक- सव्वा महिना (४० दिवस) उलटून देखील मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नव्हता. पण आज ९ ऑगस्ट रोजी शिंदे गटाच्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून एकूण १८ मंत्र्यांनी शपथ ग्रहण केली आहे. यात ९ शिंदे गटाचे मंत्री व ९ भाजप चे मंत्री सामील आहेत. सकाळी ११. १५ च्या सुमारास शपथग्रहण विधी सुरु झाला असून राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी १८ मंत्र्यांना राज भवन येथे गोपनीयतेची शपथ दिली.
शपथ ग्रहण केलेले शिवसेनेचे मंत्री : दादा भुसे, शंभूराजे देसाई, संदीपन भुमरे, उदय सामंत, तान्हाजी सावंत, अब्दुल सत्तार, दिपक केसरकर, गुलाबराव पाटील, संजय राठोड
शपथ ग्रहण केलेले भाजपचे मंत्री : चंद्रकांत पाटील, सुधीर मुंगंटीवार, गिरीश महाजन , सुरेश खाडे, राधाकृष्णविखे पाटील, रवींद्र चव्हाण, मंगल प्रभात लोढा, विजयकुमार गावित, अतुल सवे.
पण आज झालेल्या या मंत्रिमंडळात कोणतीही महिला मंत्री नाही. महिला नेत्याला मंत्रीपद देण्यात आले नसल्यामुळे विरोधक आक्रमक झाले आहे. राष्ट्रवादीच्या बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी “स्वतः पंतप्रधान मा. नरेंद्रजी मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ ‘होम मेकर’ असू नयेत तर त्या ‘नेशन बिल्डर’ असाव्यात असं ते सांगतात.पण राज्यात मंत्रीमंडळाच्या आज झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली परंतू यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही. मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक आहे.राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे,” असे ट्विट करत निशाणा साधला आहे.
तर दुसरीकडे भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांना मंत्रिपद देणं योग्य नसल्याचे म्हटले आहे. “पुजा चव्हाणच्या मृत्युला कारणीभूत असणार्या माजी मंत्री संजय राठोड ला पुन्हा मंत्रीपद दिलं जाणं हे अत्यंत दुदैवी आहे. संजय राठोड जरी पुन्हा मंत्री झालेला असला तरीही त्याच्या विरुद्धचा माझा लढा मी सुरूचं ठेवलेला आहे. माझा न्याय देवतेवर विश्वास. लडेंगे….जितेंगे”, असे ट्विट त्यांनी केले आहे. संजय राठोड हे महाविकासआघाडी सरकारमध्ये मंत्री होते. पूजा चव्हाण प्रकरणामुळे त्यांना राजीनामा दयावा लागला होता.
येणाऱ्या काळात उरलेले मंत्री शपथ घेतील असे मुख्यमंत्री शिंदे म्हणालेत.