नवी दिल्ली: काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी वधेरा यांना दुसऱ्यांदा कोरोनाची लागण झाली आहे. याची माहिती स्वतः प्रियांका गांधी यांनी ट्विट करत दिली आहे. आपली चाचणी कोरोना पॉझिटिव्ह आली आहे. घरीच स्वतःला आयसोलेट करणार असून सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, असे प्रियांका यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.
प्रियांका गांधी यांना गेल्या दोन महिन्यांत दोनवेळा कोरोनाची लागण झाली आहे. याआधी ३ जून रोजी त्यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यावेळी काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनादेखील कोरोना झाला होता. दरम्यान, काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा आजचा राजस्थानमधील अलवर दौरा प्रकृती अस्वास्थ्यामुळे रद्द करण्यात आला आहे. तेथे ते पक्षाच्या ‘नेतृत्व संकल्प शिबिर’साठी जाणार होते.
दरम्यान, देशात गेल्या २४ तासांत कोरोनाचे १६,०४७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात १९,५३९ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या देशात कोरोनाचे १ लाख २८ हजार २६१ सक्रिय रुग्ण आहेत. बुधवारी कोरोनासंसर्गदर ४.९४ टक्के एवढा होता.