वर्धा: महात्मा गांधी यांच्या जिल्ह्यात सदैव मोठमोठे गुन्हे घडतच असतात. परंतु या गुन्ह्याची पार्श्वभूमी लक्षात घेता अंगावर काटा येणारे कृत्यही करायला गुन्हेगार मागे पुढे पाहात नाही असे लक्षात येते. सविस्तर वृत्त असे की, पती दारु पिऊन रोज भांडण करायचा म्हणून पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने त्याचा कायमचा काटा काढल्याची घटना वर्ध्यातील पुलगाव येथे उघडकीस आली आहे. पत्नीने आधी गळा आवळून पतीची हत्या केली, मग मृतदेह जाळला.
मात्र शीर जळालेच नाही म्हणून रेल्वे ट्रॅकवर टाकले. अनिल मधुकर बेंदले (46) असे हत्या करण्यात आलेल्या पतीचे नाव आहे. तर मनिषा बेंदले असे आरोपी पत्नीचे नाव आहे. मयताच्या भावाच्या तक्रारीवरुन पुलगाव पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करत पत्नीसह अल्पवयीन मुलाला अटक केले आहे. पोलिसांनी मलकापूर गाठत फॉरेन्सिक चमूच्या मदतीने मृतदेहाची हाडं जमा केली. आज मृतदेहाची हाडं जमा करुन ती हाडं फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
अनिलला दारुचे व्यसन असल्याने त्याचे रोज पत्नीशी भांडण व्हायचे
वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील रेल्वेस्थानक हद्दीत 6 ऑगस्ट रोजी अज्ञात व्यक्तीचे शीर आढळून आले होते. सुरवातीला रेल्वे पोलिसांनी धड न मिळाल्याने शोध सुरू केला. तपासात ते शीर पुलगाव येथील हिंगणघाटफैल परिसरातील अनिल बेंदले यांचे असल्याचे कळले. पोलिसांनी त्यानुसार तपास सुरु केला. यामागचे कारण शोधले तेव्हा पत्नी आणि अल्पवयीन मुलानेच क्रूर पद्धतीने हत्या केल्याचे समोर आले. अनिल हा मूळचा मलकापूर बोदड येथील रहिवासी आहे. मात्र काही दिवसांपासून तो पुलगाव येथे वास्तव्यास होता. त्याचे वृद्ध वडील हे मलकापूर येथे राहत होते. अनिल आधी गृहरक्षक दलात काम करीत होता. गृहरक्षकांनी केलेल्या आंदोलनानंतर त्याला गृहरक्षक दलातून निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर तो मोलमजुरी करीत होता. त्याला दारुचेही व्यसन होते. यामुळे दररोज घरात पत्नीशी खटके उडायचे. त्याला दोन मुलगे असून, एक मुलगा दहावीत शिकत आहे. दुसरा मुलगा सहा वर्षाचा आहे. दररोजच्या उडणाऱ्या खटक्यांना कंटाळून पत्नीने अल्पवयीन मुलाच्या मदतीने घरातच अनिलची गळा आवळून हत्या केली.
हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करुन जाळले
हत्या केल्यानंतर रात्रभर त्याच्या मृतदेहाचे तुकडे केले. त्यानंतर शनिवारी दुपारच्या सुमारास मलकापूर बोदडसाठी 200 रुपयांत ऑटो केला. ऑटोचालकाला यांच्यासोबत काय सामान आहे, याची कोणतीही कल्पना नव्हती. आरोपी मनिषा आणि तिच्या मुलाने घरातून एक बॅग, मोठी पिशवी आणून ऑटोत ठेवली. चालकाने दोघांनाही अनिलच्या मूळ गावी मलकापूर बोदड येथे त्याच्या वडिलांच्या घरासमोर सोडून दिले. घरातील परिसर मोठा असल्याने मनिषाने त्या पिशव्या एका कोपऱ्यात ठेवल्या. अनिलच्या वडिलांनी विचारणा केली असता जुने कपडे आणल्याचे सांगितले. चक्क वडिलांसमोर पत्नी मनिषा आणि तिच्या मुलाने पोत्यातून अनिलचा मृतदेह त्याच्याच घरापासून काही अंतरावरच जाळला. मात्र, शीर जळाले नसल्याने ते पुलगाव रेल्वे स्थानकसमोरील रेल्वे ट्रॅकवर फेकून देत अपघाताचा बनाव केला.