संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनिओ गुटेरस युक्रेन दौऱ्यावर असतानाच युक्रेनमध्ये रशियाने हल्ला केला आहे. रॉकेटद्वारे केलेल्या या हल्ल्यामुळे १० जण जखमी झाले आहेत. काल संध्याकाळी सव्वापाचच्या सुमारास हा हल्ला झाला आहे.
या हल्ल्यामध्ये २५ मजल्यांच्या एक इमारतीच्या दोन मजल्यांचं नुकसान झालं आहे. तर आणखी एका इमारतीला आग लागली असून तिथून काळा धूर येताना दिसत असल्याचीही नोंद झाली आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू आहे.
अग्निशमन दलाचे १२ बंब घटनास्थळी दाखल झाले असून १० जण जखमी झाले आहेत. हा हल्ला संयुक्त राष्ट्रांचे अध्यक्ष आणि त्यांच्या गटासाठी धक्कादायक होता. मात्र त्यामध्ये त्यांना कोणतीही हानी झालेली नाही. हा युद्धजन्य भाग आहे, मात्र आमच्या इतक्या जवळ ही घटना घडली हे धक्कादायक आहे, अशी भावना प्रवक्त्यांनी व्यक्त केली आहे.
गुटेरस आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची संयुक्त पत्रकार परिषदेला एक तास उलटण्यापूर्वीच हा हल्ला झाला. या पत्रकार परिषदेच्या ३.५ किलोमीटरच्या परिसरातच हा हल्ला झाला. या हल्ल्याबद्दल बोलताना झेलेन्स्की म्हणाले की, आज क्यीवमध्ये आमची चर्चा पार पडल्यानंतर लगेचच रशियाच्या क्षेपणास्त्रांनी शहरावर हल्ला केला. यावरून रशियाच्या नेतृत्वाचे संयुक्त राष्ट्रांना तसंच ही संघटना ज्या तत्वांचं प्रतिनिधित्व करते, त्यांना अपमानित करण्याचे प्रयत्न दिसून येतात.