उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीचे पडसाद महाराष्ट्रातही उमटत आहेत. या निवडणुकीत समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस यांच्या युतीची जोरदार चर्चा महाराष्ट्रात झाली. या युतीत समाजवादी पक्षाने राष्ट्रवादीला अनुपशहर हा मतदारसंघ जाहीर करून तेथे उमेदवारही निश्चित केला होता. मात्र काही स्थानिक बातम्यांनुसार समाजवादी पक्षाने हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडून काढून घेतल्याची चर्चा आहे. समाजवादी पक्षाने आपल्या उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केलेली नाही. अचानक मतदार संघच गायब झाल्याच्या वृत्ताने मात्र भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी ट्विट करत शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना मोलाचा सल्ला दिला आहे.
समाजवादी पक्ष आणि राष्ट्रवादीतील प्राथमिक चर्चेनुसार येथील जागेवर राष्ट्रवादीचे के. के. शर्मा यांची उमेदवारी 12 जानेवारी रोजी जाहीर करण्यात आली होती. पक्षाच्या उमेदवारांसोबत अखिलेश यादव यांचे छायाचित्रही समाजवादी पक्षाने जारी केले होते. मात्र काही स्थानिक माध्यमांनी ही जागा समाजवादी पक्षाने पुन्हा आपल्याकडे घेतली असून येथे होशियारसिंग यांना उमेदवारीही दिल्याचे वृत्त हाती आले आहे. समाजवादी पक्षाने अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्याच्या आधीच हे वृत्त पसरल्याने महाराष्ट्रात भाजपला मात्र आनंद झाला आहे.
आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत ट्विट करत राष्ट्रवादी काॅंग्रेसची महती सांगण्यात संजय राऊत हे कमी पडले असल्याने समाजवादी पक्षाने ही जागा काढून घेतली असावी, असा टोला लगावला आहे. हा अपमान सहन करण्यासारखा नाही, अशी पुस्तीही वर जोडली आहे.
या साऱ्या घडामोडींवर राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेनेने येथे 50 ते 100 जागा लढविण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबत अद्याप हालचाली झालेल्या नाहीत.