चारधाम यात्रेतील यात्रेकरूंना घेऊन जाणारी एक बस रविवार, ५ जून रोजी संध्याकाळी दरीत कोसळून अपघात झाला. उत्तरकाशीजवळ झालेल्या या अपघातात २५ जणांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. ही बस ३० प्रवाशांना घेऊन यमुनोत्रीला जात होती, अशी माहिती समोर आली आहे.
उत्तराखंडमधील यमुनोत्री राष्ट्रीय महामार्गावरून ही बस यमुनोत्रीकडे जात होती. उत्तराखंड राज्याच्या हद्दीत दामता येथे ही बस दरीत कोसळली. अपघात झालेले ठिकाण हे उत्तर काशी ते देहरादून यांच्या दरम्यान आहे. या बसमध्ये ३० जण होते. तर अपघातात २५ जणांचा मृत्यू झाला आहे.
मृत झालेले भाविक हे मध्य प्रदेशचे होते. या अपघातानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या दुर्घटनेवर तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तसेच ते रात्री उत्तराखंडला रवाना झाले आहेत. मंत्री ब्रजेंद्र प्रताप सिंह आणि चार वरिष्ठ अधिकारीही त्यांच्यासोबत उत्तराखंडला गेले आहेत.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी या घटनेवर शोक व्यक्त करत राज्य सरकारच्या वतीने मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख आणि जखमींना ५० हजार देण्याची घोषणा केली आहे.