हिंसाराचा उद्रेक कायम
भारताचा शेजारील देश श्रीलंका हा सर्वात भीषण अशा आर्थिक संकटाचा सामना करत आहे. देशात हिंसाचार उसळला आहे. दरम्यान श्रीलंकेतील सर्व कॅबिनेट मंत्र्यांनी रविवार, ३ एप्रिल रोजी रात्री तत्काळ आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. सामूहिक राजीनामा देण्याचे कोणतेही कारण सांगण्यात आलेले नाही.
कॅबिनेट मंत्र्यांनी श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबायो राजपक्षे यांच्याकडे राजीनामे सुपुर्द केल्याचे देशाचे शिक्षण मंत्री आणि सभागृह नेते दिनेश गुणवर्धने यांनी सांगितले. देशातील सध्याच्या आर्थिक परिस्थितीमुळे मंत्र्यांवर असलेल्या प्रचंड दबावामुळे मंत्र्यांनी राजीनामा दिल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
परिस्थिती चिघळण्याची शक्यता असल्यामुळे राष्ट्रपती राजपक्षे यांनी शुक्रवारी रात्री उशिरा श्रीलंकेत तत्काळ आणीबाणी लागू करण्याची घोषणा केली. त्यापूर्वी कर्फ्यूही लागू करण्यात आला होता. मात्र, कर्फ्यू लागू असूनही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. आंदोलक राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत.
राष्ट्रपती सरकारने शनिवार संध्याकाळी सहा वाजेपासून सोमवारी सकाळी सहा वाजेपर्यंत ३६ तासांचा कर्फ्यूही लागू केला. कर्फ्यू काळात श्रीलंका सरकारने व्हॉट्सअप, ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्राम या सोशल मीडिया ऍपवरही बंदी घातली होती. मात्र ही बंदी रविवारी उठवण्यात आली.