ओबीसी आरक्षणाचा लढा आम्ही शेवटपर्यंत सुरूच ठेवणार, कितीही किंमत मोजावी लागली, तरी आम्ही आमचे धोरण ठेवणारच. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणावरील स्थगिती कायम ठेवून राज्य सरकारला कोणत्याही परिस्थितीत ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घ्या, असा आदेश दिल्यामुळे भारतीय जनता पक्षाने ओबीसीचे आरक्षण असो वा नसो २७ टक्के ओबीसींना आरक्षण देणार, अशी घोषणा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.
जुलमी सरकारच्याविरोधात आता एल्गार पुकारण्याची वेळ आली आहे, वेळीच सुधारा अन्यथा ओबीसी समाज ठाकरे सरकारला खाली खेचेल, असेही फडणवीस म्हणाले. या लढ्यात एकेक ओबीसींचा कार्यकर्ता संपूर्ण ताकदीने उभा राहिला पाहिजे, त्यासाठी कितीही बलिदान द्यावे लागेल तरी आम्ही द्यायला तयार आहोत, त्यासाठी भाजप तुमच्या पाठीशी उभी राहील, असेही फडणवीस म्हणाले. काहीही झाले तरी ओबीसी आरक्षण परत मिळवल्याशिवाय भाजप शांत बसणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.