गुजरातमध्ये पाकीस्तानी बोटीतून वाहतूक करण्यात येणारे 77 किलो हेरॉईन हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्याची आंतराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत 400 कोटी रुपये आहे. बोटीतून सहा खलाशांना अटक करण्यात आली आहे. भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात दहशतवाद प्रतिबंधक पथकाने (एटीएस) ही कारवाई केली. संरक्षण खात्याच्या गुजरातमधील जनसंपर्क अधिकाऱ्याने ट्विट करून ही माहिती दिली. अल हुसेनी ही पाकिस्तानी मच्छीमारी बोट जाखाऊ किनाऱ्यावर आणण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचे त्यात म्हटले आहे. अशाच संयुक्त कारवाईत एप्रिल महिन्यात 150 कोटी रुपयांचे 30 केली हेरॉईन जप्त करण्यात आले होते.
गुजरातच्या मोरबी जिल्यातील एका बांधकाम सुरू असणाऱ्या घरातून गेल्या महिन्यात 600 कोटी रुपयांचे हेरॉईन जप्त करण्यात आले होते. भारतीय हस्तकाला पाकिस्तानी ड्रग विक्रेत्याकडून हे हेरॉईन पाठवण्यात आले होते, असे एटीएसच्या निवेदनात म्हटले आहे. कच्छ मधील मुंदरा बंदरातून सप्टेंबर महिन्यात अफगाणिस्तानातून आलेले तीन हजार किलो हेरॉईन महसूल गुप्तचर संचनालयाने जप्त केले होते.