सातारा जिल्ह्यातील वाई शहरातून वाहणाऱ्या कृष्णा नदीवरील जुना ब्रिटिश कालीन पूल पाडण्यास सुरुवात झाली आहे. या कृष्णा नदीवर सात घाट आणि शेकडो पौराणिक मंदिरे असल्यामुळे वाई शहरास दक्षिण काशी संबोधले जाते. याच वाई शहराच्या उत्तर- दक्षिण भागास जोडणारा मुख्य ब्रिटीश कालीन कृष्णा पूल आहे.
या पुलाला 135 वर्षे पूर्ण झाली असून तो पाडण्यात येत असल्याने वाईकरांमधून हळहळ व्यक्त होत आहे. 1884 साली ब्रिटीशांच्या राजवटीत हा पूल बांधण्यात आला होता. पुलाला शंभर वर्षे पूर्ण झाल्यानंतर 1984 साली ब्रिटीश शासनाने महाराष्ट्र शासन आणि वाई नगरपालिका यांना पुलाची मुदत संपल्याच्या बाबतीत पत्र पाठवले होते.
या पुलावर मोठया प्रमाणावर झाडे-झुडपे उगवली होती. गेली अनेक वर्षे एक नवीन सक्षम पूल उभारण्याची मागणी केली जात होती. तसेच नागरिकांच्या दृष्टीने संभाव्य धोका लक्षात घेऊन पालिका प्रशासनाने नवीन पुलाचा आराखडा तयार करून राज्य शासनाकडे पाठवला होता. पुलाचे शहराच्या दृष्टीने महत्व ओळखून शासनाने पुलाला मंजुरी दिली.
नवीन तंत्रज्ञानाने युक्त पंधरा कोटींचा आराखडा असणारा नवीन पूल मंजूर करण्यात आल्या नंतर अनेक वर्ष वाईकरांना खंबीर साथ दिलेला ब्रिटिश कालीन पुल आता पाडण्यात येत आहे. पाडण्यात येणाऱ्या या पुलाविषयी वाईकरांच्या भावना अतिशय हळव्या आहेत.