पण…तारखांचा मेळ जुळता जुळेना!
नाशिक येथे होणाऱ्या 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची मैफल भुजबळ नॉलेज सिटीत रंगणार आहे. शिवाय तारखांचा मेळ जुळत नसल्यामुळे संमेलन नोव्हेंबर ऐवजी डिसेंबर महिन्यात घेण्यावर विचारविनिमय सुरू असल्याचे समजते.
कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे पुढे ढकलेले गेलेले 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नाशिकमध्ये अखेर होणार आहे. मार्च महिन्यातल्या 26 ते 28 मार्चच्या दरम्यान हे साहित्य संमेलन होणार होते. त्यासाठी निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या. त्या संबंधितांपर्यंत पोहचल्याही होत्या. मात्र, कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळे हे संमेलन पुढे ढकलावे लागले. जुलै महिन्यात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतुकराव ठाले-पाटील यांनी पालकमंत्री छगन भुजबळांना पत्र पाठवले होते. त्यात जुलै महिन्यात साहित्य संमेलन भरवणे शक्य आहे का, अशी विचारणा केली होती.
मात्र, त्यावेळेसही त्यांना नकार कळवण्यात आला. मात्र, आता दसऱ्यानंतर जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची आढावा घेऊन दिवाळीनंतर नोव्हेंबरमध्ये साहित्य संमेलन घेण्याचा विचार सुरू आहे, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली होती. नोव्हेंबर महिन्यातील 19, 20, 21 या तीन तारखांचा विचार आयोजकांकडून सुरू होता. मात्र, आता या तारखात बदल करून हे संमेलन डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घेण्याबाबत विचार सुरू आहे. शक्यतो 3 ते 5 डिसेंबर दरम्यान हे साहित्य संमेलन होईल, अशी शक्यता आहे.