नागपूर : राज्याच्या उपराजधानीत झिरो माईल पासून अवघ्या १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या काटोल रोड स्थित बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय लगत असलेल्या जंगलाला रविवार (२२ मे) रोजी अचानक आग लागली. आगीत शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले. या घटनेचे वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांसोबत वन अधिकाऱ्याने अभद्र व्यवहार केला. त्यामुळे, पत्रकारांना हवी तसे वार्तांकन करता आले नाही. या भीषण आगीमुळे उद्यानातील वन्यजीवांमध्ये अफरातफरी माजली होती.
सविस्तर वृत्त असे की, नागपूर शहरातील बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाला रविवार (२२ मे) रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास आग लागल्याची घटना एका पत्रकाराच्या लक्षात आली. तो पत्रकार या उद्यानालगतच राहतो. या घटनेचे माहिती त्या पत्रकाराने वन अधिकाऱ्यांना दिली. एक ते दीड तासानंतर फायर ब्रिगडचे वाहन गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयात पोहचले. तो पर्यंत शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले होते. आग इतकी भयानक होती की आकाशात आगीचे गोळे दिसत होते. जवळपास दोन हजार हेक्टर मध्ये बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालय उभारण्यात आले आहे.
या प्राणी संग्रहालयात वाघोबा, बिबट, अस्वल, तृणभक्षी प्राणी वास्तव्यास आहेत. या वन्यजीवांना आगीचा फटका बसला असावा अशी शंका व्यक्त केली जात आहे. या घटनेचे वार्तांकन करायला गेलेल्या पत्रकारांना बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी संग्रहालयाचे वन अधिकाऱ्यांनी बातमी करण्यास मज्जाव करुन पत्रकारांसोबत अभद्र व्यवहार केला. त्यामुळे काही काळ वनाधिकारी व पत्रकारांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. या घटने संदर्भात प्राणी संग्रहालयाच्या अधिकाऱ्यांशी भ्रमणध्वनी द्वारे संवाद साधला असता. आपल्या कर्मचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न त्या अधिकाऱ्याने केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना या घटने संदर्भात शहरातील पत्रकार तक्रार करणार आहेत.
जंगलाला आग कश्यामुळे लागली? हा तर शोधाचा विषय आहे. पण शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले. या जंगलात वास्तव्यास असलेल्या वन्यजीवांना आगीचा फटका बसला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या संपूर्ण घटनेची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी चौकशी करावी, अशी मागणी वन्यप्रेमींनी केली आहे. तसेच वारंवार आग लागू नये यासाठी ठोस उपाययोजना करावी असेही नागरीकांचे म्हणणे आहे.