नागपूर: भंडारा जिल्ह्यातील सव्वाशे वर्ष जुनी मन्रो शाळेचे कवेलू बदलण्याचे कार्य चालू आहे. शाळेची डागडुजी होणार होती. पण डागडुजीच्या नावाखाली या शाळेच्या जुन्या बहुमूल्य कवेलूच्या खाली असलेला सांगाडा, इंग्रजांनी विशिष्ट शैलीने तयार केलेल्या हवाकक्ष, खिडक्या सर्रास तोडण्यात येत आहेत. वास्तविक पाहता या हवाकक्ष, खिडक्या व कवेलू बसवण्याकरिता तयार केलेला लाकडी सांगाडा ज्यामध्ये विशिष्ट पद्धतीने कवेलूवरील पाणी काढण्यासाठी डोंगी सुद्धा लाकडापासून तयार केलेली आहे. अशा भक्कम काम असलेल्या शाळेच्या सौंदर्याला उध्वस्त करण्याचे काम केले जात आहे.
याआधी देखील जिल्ह्यातील इतिहासकालीन असलेले लाल बहादूर शास्त्री विद्यालयाच्या (मनरो) पटांगणात दुकान गाळ्यांचे बांधकाम थांबविण्यात यावे अशी मागणी नागरिकांकडून आणि माजी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली होती. ही एक ऐतिहासिक वास्तू असून या शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी जिल्ह्याचे नाव मोठे केले आहे. तसेच शाळेच्या पटांगणात बांधकाम केल्यास सगळे वैभव जाईल. त्यामूळे सदर बांधकामाला मोठ्या प्रमाणात सामाजिक संघटना, काही पक्ष तसेच शाळेचे आजी-माजी विद्यार्थ्यांचा सक्त विरोध होता. पुरातत्व विभागाने देखील या बांधकामावर आक्षेप घेतला होता. कोर्टाच्या आदेशानुसार कुठलेही बांधकाम करता येणार नव्हते.
शाळेच्या जागेवरील बांधकामावर कोर्टाकडून स्टे ऑर्डर मिळाला आहे.
सव्वाशे वर्षांचा काळ लोटून सुद्धा या सगळ्या वस्तू जशाच्या तशा स्थितीत आहे. परंतु या जुन्या कवेलू बदलविण्याचा नावाखाली ऐतिहासिक पुरावे नष्ट करण्याचा डाव तर नाही ना ??? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण काही कवेलू मध्ये १८६५ सालाची नोंद आहे, सगळीकडे सिमेंटचे जंगल उभे होत असताना शाळेची ही कौलारु ऐतिहासिक वास्तू आपल्या इतिहासाची साक्ष म्हणून उभी आहे .
शाळेचे कवेलू, इमारत किंवा तिचा परिसर याची दुरुस्ती व डागडुजी करताना तिचे सौंदर्य अबाधित ठेवणे व मूळ स्थापत्य शैलीला तडा जाणार नाही याचे भान ठेवणे आवश्यक आहे जेणेकरून मन्रो शाळेची ऐतिहासिक वास्तू पुढच्या पिढ्यांना पर्यंत जशीच्या तशी पोहोचवणे हे सामाजिक कर्तव्य आहे. भंडारा जिल्ह्याची शान असलेली ही शाळा वाचवण्यासाठी प्रत्येकाने पुढाकार घेणे आवश्यक आहे नाहीतर गांधी शाळेसारखी हे पण शाळा इतिहासात जमा होईल, असे भंडारा वासियांचे म्हणणे आहे. भंडारा जिल्ह्यातील लाल बहादूर शास्त्री विद्यालय (मनरो) याची प्रतिष्ठा जपून राहिली पाहिजे याकरिता शाळेचे माजी विद्यार्थी अथक प्रयत्न करत आहेत.