देशात मागील पाच दिवसात दुसऱ्यांदा एकाच दिवशी कोरोना प्रतिबंधक लसीचे एक कोटी डोस देण्याचा नवा विक्रम रचण्यात आला आहे. तब्बल 1.30 कोटी लोकांना मंगळवारी एकाच दिवसात कोरोना लसीचा डोस देण्यात आला आहे. त्याचबरोबर देशातील 65 कोटीहून अधिक नागरिकांना कोरोना लसीचे डोस देण्यात आले असून देशातील 50 टक्के लोकांना पहिला डोस देण्यात आला आहे. हिमाचल प्रदेशने राज्यातील 100 टक्के लोकांना कोरोना लसीचा पहिला डोस दिला, असून असे करणारे हिमाचल प्रदेश देशातील पहिलेच राज्य ठरले आहे.
एकूण 18.6 कोटी डोस ऑगस्ट महिन्यात देण्यात आले आहेत. कोरोनाच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात एकाच महिन्यात डोस देणारा भारत हा एकमेव देश आहे. तर 21 ते 27 ऑगस्ट या दरम्यान, एकाच आठवड्यात देशात एकूण 4.66 कोटी लसी देण्यात आल्या, हाही एक विक्रमच आहे. मंगळवारी कोरोना लसीकरणाचा 228 वा दिवस होता. देशात काल संध्याकाळी सात वाजेपर्यंत कोरोना लसीचे 1.04 कोटी डोस देण्यात आले होते. त्यावेळीच देशातील 50 नागरिकांना लसीचा पहिला डोस पूर्ण झाल्याची नोंद झाली.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असताना देशातील लसीकरणाच्या कार्यक्रमाने वेग घेतला आहे. येत्या काळातही लसीकरणाचा वेग हा असाच ठेवण्यात येणार असून देशातील जास्तीत जास्त लोकसंख्येचे लवकरात लवकर लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मडाविया यांनी देशातील लसीकरणाच्या या विक्रमाचे कौतुक केले असून आपल्या संदेशात ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या #SabkoVaccineMuftVaccine अभियानाला देशातील लसीकरणाच्या या विक्रमाचे श्रेय हे जाते. मोदींचे प्रयत्न आणि सातत्याने श्रम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे आहे. देशात दिवसेंदिवस लसीकरणाची संख्या वाढत आहे. यासाठी सर्व भारतीय नागरिकांचे अभिनंदन