मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपींच्या जमिनी नवाब मलिक यांनी खरेदी केल्याचा आरोप
क्रूझ ड्रग्ज प्रकरणात एनसीबी विरुद्ध एनसीपीत सुरु झालेली लढाई आता भाजपापर्यंत जाऊन पोहचली आहे. एका ड्रग्ज पेडलरसोबत पत्नीचे नाव जोडल्यामुळे नाराज झालेले राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत नवाब मलिक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
मलिक यांच्या कंपनीने ज्या लोकांकड़ून जमीन खरेदी केली आहे, ते १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी असल्याचे फडणवीसांनी म्हटले आहे. या जमिनी दाऊद इब्राहिमशी संबंधित असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे, याबाबतची कागदपत्रेही त्यांनी सादर केली आहेत.
काही दिवसांपूर्वी फडणवीस यांनी नवाब मलिकांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा आरोप केला होता. दिवाळीनंतर या प्रकरणात बॉम्ब फोडणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या आरोपांनंतर काही वेळातच नवाब मलिक यांचीही पत्रकार परिषद होणार आहे, त्यात मलिक या आरोपांना उत्तर देण्याची शक्यता आहे.