केंद्र सरकारतर्फे नित्यानंद राय यांनी दिली माहिती
कलम ३७० जम्मू काश्मीरमधून हटवल्यानंतर जमीन खरेदीचे नियम शिथिल करण्यात आल्यानंतर तिथे देशभरातील कोणत्याही नागरिकांना जमीन खरेदी विक्रीचे व्यवहार करण्याचा मार्ग मोकळा झाला होता. २०१९ मध्ये हे लागू झाल्यानंतर आतापर्यंत किती जणांनी तिथे जमीन खरेदी केली, याची माहिती लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात देण्यात आली आहे. यासंदर्भात विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी ही माहिती दिली आहे.
लोकसभेत लेखी उत्तरात केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय यांनी म्हटले आहे की, जम्मू काश्मीर सरकारने दिलेल्या माहितीनुसार, ऑगस्ट २०१९ पासून राज्याबाहेरील दोन व्यक्तींनी दोन मालमत्ता खरेदी केल्या आहेत. कलम ३७० हटवण्याला काही दिवसांपूर्वी दोन वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने देशाने नुकताच दुसरा वर्धापन दिन साजरा केला. ५ ऑगस्ट २०१९ रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द करण्यात आले होते. केंद्रातील मोदी सरकारने जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशामध्ये (जम्मू -काश्मीर आणि लडाख) विभाजन करण्याची घोषणा केली होती.
केंद्र सरकारने त्यानंतर काश्मीरमध्ये शेतीपूरक नसलेली जमीन राज्याबाहेरील लोकांना खरेदी करण्याची परवानगी दिली होती. पूर्वी फक्त जम्मू काश्मीरचे लोकांना येथील जमीन खरेदी करता येत होती. जम्मू काश्मीरचा स्थानिक रहिवाशी होण्यासाठी नियमांमध्येही बदल करण्यात आले आहेत. इतर राज्यांतील पुरुषांनी जम्मू काश्मीरमधील मुलीशी लग्न केले, तर त्यांना तेथील कायमचे रहिवाशी बनवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत अशा प्रकरणांमध्ये महिलेच्या पती आणि मुलांना जम्मू काश्मीरचे कायमचे रहिवासी मानले जात नव्हते.