भारतातील हवामान बदल आणि जागतिक तापमानवाढ हा सध्या जगापुढचा सर्वांत महत्त्वाचा प्रश्न असून, त्याचे दुष्परिणाम आत्ताच दिसू लागले आहेत. तापमान वाढ कमी करण्यासाठी ठरवलेलं उद्दिष्ट साध्य केलं गेलं नाही, तर नजीकच्या भविष्यकाळात मानवजातीला गंभीर दुष्परिणामांना तोंड द्यावं लागणार असल्याचा इशारा दिला जात आहे.
हरित ऊर्जेची निर्मिती हा यावरचा एक महत्त्वाचा उपाय असून, या संदर्भात रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी एक महत्त्वाची घोषणा केली आहे. 2035 पर्यंत नेट झीरो कार्बन कंपनी बनण्याचं उद्दिष्ट RIL ने ठेवलं असल्याचं अंबानी यांनी सांगितलं. ते आज इंटरनॅशनल क्लायमेट समिटमध्ये बोलत होते.
2030पर्यंत 100 GW एवढ्या अपारंपरिक ऊर्जेची निर्मिती करणारे प्लांट्स उभारण्याचं लक्ष्य RIL ने ठरवलं आहे, असं अंबानी यांनी सांगितलं. आगामी काळात सौर ऊर्जानिर्मितीची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. पुरेसा साठा, स्मार्ट मीटरचा वापर यांचं सौर ऊर्जानिर्मितीला साह्य होईल. कार्बन उत्सर्जन घटवण्यासाठी ग्रीन हायड्रोजनची भूमिका महत्त्वपूर्ण असेल. या सगळ्या बाबी लक्षात घेऊन कंपनी पुढचं नियोजन करत आहे, असं मुकेश अंबानी यांनी या परिषदेत सांगितलं