तालिबान आणि अल कायदा पुन्हा एकदा अफगाणिस्तानमध्ये एकत्र येत असल्याची माहिती अमेरिकेने दिली आहे. अफगाणिस्तानातून आपले सैन्य मागे घेतल्यानंतरही अमेरिका तालिबान आणि त्याच्या सरकारवर नजर ठेवून आहे. अमेरिकेचे जॉइंट चीफ्स ऑफ स्टाफ जनरल मार्क मिल्ली यांच्या म्हणण्यानुसार, तालिबान आणि अल-कायदा अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्य मागे घेतल्यानंतर पुन्हा एकत्र येत आहेत. यामुळे येत्या काळात जगावर धोका वाढू शकतो.अशी भीती त्यांनी वर्तवली आहे.
काही दिवसांपूर्वी न्यूयॉर्क टाइम्सने आपल्या एका अहवालात दावा केला होता की, अल कायदा वेगाने अफगाणिस्तानात आपले पाय रोवत आहे आणि अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर हे संकट अधिकच वाढण्याची शक्यताही वर्तवण्यात आली होती. अफगाणिस्तानमध्ये लष्करी कमांड असलेले सर्व अमेरिकन अधिकारी अमेरिकन सिनेटच्या सशस्त्र सेना समितीसमोर हजर झाले आहेत.
तालिबान आणि अल कायदा यांच्यातील संबंधांबाबत अमेरिकेचे जॉइंट चीफ ऑफ स्टाफ जनरल मार्क मिल्ली यांच्याकडून प्रश्न विचारण्यात आला. प्रत्युत्तरादाखल मार्क मिल्ली म्हणाले की, तालिबानने कधीही अल-कायदाशी आपले संबंध संपवावेत अशी अपेक्षा करणे अयोग्य आहे. खरं तर, तालिबानने कधीही अल-कायदाशी आपले संबंध तोडले नाहीत. तालिबानने दोहा कराराचे पालन केले नसल्याचे देखील त्यांनी सांगितले आहे.