जगातील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी असलेल्या अमेझॉनचे मालक जेफ बेजोस यांनी पहिले खाजगी अंतराळ केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकल्पासाठी जेफ बेजोस यांनी इतर काही खाजगी कंपन्यांशीही चर्चा सुरू केली आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था असलेल्या नासाने वीस वर्षांपूर्वी उभारलेल्या इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचा कालावधी 2030 मध्ये संपत असतानाच जेफ बेझोस यांनी हा पुढाकार घेतल्याने ही गोष्ट महत्त्वाची मानण्यात येत आहे.
नासाने उभारलेल्या या स्पेसस्टेशन साठी तब्बल शंभर अब्ज डॉलरचा खर्च आला होता. नासा पुन्हा एकदा नव्याने अंतराळ संशोधन केंद्र उभारणार की नाही याबाबत चर्चा सुरू असतानाच जेफ बेजोस यांच्या कंपनीने हा प्रस्ताव तयार केला आहे. अमेझॉन कंपनीचा हा प्रस्ताव आरबीटल रिफ या नावाने ओळखला जात आहे.
जेफ बेजोस यांच्या कंपनीने यापूर्वीच अंतराळ पर्यटनाचा निर्णय घेतला असून त्याबाबत पुढाकारही घेतला आहे. अंतराळ संशोधनात संदर्भित बाबींसाठी कंपनीतर्फे दरवर्षी एक अब्ज डॉलरची तरतूदही करण्यात आली आहे.
चीन मधील काही खाजगी कंपन्या ही अंतराळात संशोधनासाठी पुढाकार घेत असतानाच आता अमेझॉन कंपनीनेही पुढाकार घेतला असल्याने या क्षेत्रातही आता स्पर्धा जाणवणार आहे.