चंद्रपूर: शहरासह सिंदेवाही तालुक्यात उल्कापातासारखी दिसणारी रोषणाई आकाशात दिसून आली असली तरी आता या वेगाने जाणाऱ्या वस्तूचे अवशेष चंद्रपुरामध्ये दोन दिवसात आढळून आले आहेत. आठ फूट बाय आठ लांबीची एक रिंग सिंदेवाहीत आढळली आहे. तर एक भलामोठा लोखंडी गोळा देखील सापडला आहे. हे एखाद्या उपग्रहाचे अवशेष असावेत, असं तज्ज्ञांकडून सांगितलं जात होतं.
उपग्रहाचे सर्व अवशेष पोलीस प्रशासनाकडे आहेत. खगोल शास्त्राचा अभ्यास करणारे प्रा सुरेश चोपणे यांची टीमही दोन दिवसापासून चंद्रपुरात तळ ठोकून तपास करीत आहेत. अशातच चंद्रपूर जिल्ह्यात चार ठिकाणी उपग्रहाचे अवशेष मिळाल्यानंतर इस्त्रो व डीआरडीओ सोबत संपर्क साधण्यात आलेला आहे. त्यांना लोखंडी रिंग, चेंडूच्या आकाराचे सिलेंडर व घटनास्थळाची छायाचित्रे पाठविली आहे. इस्त्रोला सविस्तर मेल पाठविल्यानंतर त्यांनी या संपूर्ण बाबीची माहिती घेण्यासाठी एक टीम येणार आहे. मात्र, ही टीम नेमकी कधी येणार याबाबत मात्र कळविले नाही.” अशी माहिती चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी आज 4 एप्रिल रोजी प्रसार माध्यमांना दिली.
चंद्रपूर जिल्ह्यात चार ठिकाणी अवशेष मिळाल्यानंतर अमेरिकेतील भौतिकी विभागाचे तज्ञ जॉनाथन मॅक्डोवेल यांच्याशी संपर्क साधण्यात आला. त्यांना ईमेलवर या भागात मिळालेल्या अवशेषाची सर्व छायाचित्र आणि माहिती पाठवली. त्यानंतर त्यांनी स्वत: संपर्क करून व मेलच्या माध्यमातून या बाबीची खात्रीलायक माहिती दिली आहे. विशेष म्हणजे त्यांनी सर्व छायाचित्रे तपासून बघितली, ही सर्व छायाचित्रे त्यांनी सातत्याने तपासून बघितल्यानंतर चीनच्या उपग्रहाचे अवशेष असल्याचे सांगितले आहे. हे अवशेष न्यूझीलंड येथील नाहीत.” अशी माहिती चंद्रपूर येथील राजीव गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापक सचिन यांनी दिली आहे.
मागील दोन दिवसापासून सरकारी यंत्रणेला याबाबत जाग आली नसून शहरातील तज्ञ, अभ्यासक व नागरीक याबाबत चिंता व्यक्त करीत आहे. पृथ्वीवर जीवितहानी होऊ नये म्हणून सरकारने या बाबीकडे गांभीर्याने लक्ष देणे महत्वाचे असल्याचे तज्ञांचे मत आहे.