सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांना ईडीने समन्स बजावले होते. त्याविरोधात अडसूळ यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे. ईडीने बजावलेले समन्स आणि गुन्हा रद्द करण्यासाठी तसंच, याचिकेवरील सुनावणी प्रलंबित असेपर्यंत अटकेपासून अंतरिम संरक्षण द्यावे, अशी विनंतीही अडसूळ यांनी न्यायालयाला केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने अडसूळ यांना तूर्तास दिलासा देण्यास नकार दिला आहे.
आनंद अडसूळांवर सिटी सहकारी बँक घोटाळ्यासंदर्भात कारवाई करण्यात येत आहे. मुंबईत २७ शाखा असलेल्या सिटी सहकारी बँकेवर घोटाळ्यामुळे सन २०१८पासून रिझर्व्ह बँकेचे निर्बंध आहेत. आनंद अडसूळ हे या बँकेचे अध्यक्ष असून, अभिजित अडसूळ हे संचालक आहेत. नियमबाह्य कर्ज दिल्यानेच ही बँक घोटाळ्यात अडकली व त्यात आर्थिक गैरव्यवहार झाला, असा ईडीचा संशय आहे. त्याच पार्श्वभूमीवर ईडीने तपास सुरू केला आहे. सिटी सहकारी बँकेने दिलेली कोट्यवधींची कर्जे बुडीत खात्यात गेली. त्यामुळेच या घोटाळ्यात अडसूळ यांचा नेमका सहभाग काय होता, यासंबंधी चौकशीसाठी अडसूळ पिता-पुत्रांना चौकशीचे समन्स बजाविण्यात आले होते. परंतु, दिल्लीत बैठक असल्याचे सांगून हे दोघेही उपस्थित राहिले नाहीत.