महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील साखर कारखान्यांच्या घोटाळा प्रकरणात राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांची ईडीकडून चौकशी करण्यात आली आहे. मात्र यावरूनच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आता थेट राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर निशाना साधला आहे.
राम गणेश गडकरी साखर कारखाना प्राजक्त तनपुरेंच्या नावाने ट्रान्सफर करण्यात आला. १०० कोटीची संपत्ती १३ कोटीत दिली गेली. तीच संपत्ती तनपुरे यांनी अनिल देशमुख यांना पास ऑन केली. प्राजक्त तनपुरे हे अनिल देशमुखांच्या वाटेवर असून त्यांच्यावरही कारवाई होणार.तसेच शरद पवारांच्या आशीर्वादानं अनिल देशमुख यांनी बेनामी पद्धतीनं प्राजक्त तनपुरे यांच्याद्वारे रामगणेश गडकरी साखर कारखाना काबीज केला. त्याचे पुरावे बाहेर आले आहेत, त्यांच्या अडचणी वाढणार असल्याचा इशारा किरीट सोमय्या यांनी दिला आहे.
दरम्यान प्राजक्त तनपुरे यांनी मात्र सर्व आक्षेप फेटाळून लावले आहेत. ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना मी समाधानकारक उत्तरं दिली आहेत. तसंच पुढे त्यांनी बोलावल्यास आपण चौकशीला जाऊ, असंही तनपुरे म्हणाले आहेत. मला आज दुपारी एक वाजण्याच्या सुमारास ईडीने चौकशीला बोलावलेलं होतं. मात्र ईडीचे अधिकारी एका बैठकीत व्यस्त होते. त्यामुळे तीन वाजल्यापासून चौकशीला सुरुवात झाली. मी ईडीला सविस्तर उत्तर दिलेली आहेत.
मला जे जे प्रश्न विचारण्यात आले त्यांची मी त्यांना उत्तर दिलेली आहेत. जे आक्षेप नोंदवले जात आहेत त्यात काहीही तथ्य नाही. काही तांत्रिक माहिती जी मी पाठ करु शकत नाही ती मला पुन्हा बोलावल्यास मी ईडीच्या अधिकाऱ्यांना देईन, असं तनपुरे यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.