मागील अनेक दिवसांपासून भूमिगत असलेले राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे आज सक्तवसुली संचालनालयाच्या (ED) कार्यालयात प्रकटले आहेत.
अनिल देशमुख हे सध्या मनी लॉण्ड्रिंग व खंडणी वसुलीच्या आरोपांच्या प्रकरणात ईडीच्या रडारवर आहेत. मुंबई माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले होते. त्याशिवाय, त्यांच्यावर मनी लॉण्ड्रिंगचाही आरोप होता. यापूर्वी देशमुख यांना चौकशीला हजर राहण्यासाठी अनेकदा समन्स बजावण्यात आले होते. पण ते ईडीसमोर हजर झाले नव्हते. ईडीच्या अधिकाऱ्यांना शोध घेऊनही ते सापडत नव्हते. अखेर आज अनिल देशमुख ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले आहेत.
ईडीच्या कार्यालयात हजर होण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत म्हटलं आहे कि, “ईडीचं पहिलं समन्स आल्यापासून अनिल देशमुख हे ईडीला सहकार्य करत नसल्याचे आरोप होत होते. मात्र, ते खरं नाही. ज्या-ज्या वेळी मला समन्स आलं, त्यावेळी मी ईडीला उत्तर पाठवलं होतं. माझी याचिका उच्च न्यायालयात आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. सर्वोच्च न्यायलयातही मी याचिका दाखल केली आहे. त्याचा निकाल आल्यानंतर मी स्वत: ईडीच्या कार्यालयात येईन, असं मी ईडीला कळवलं होतं.
ज्या ज्या वेळी ईडीनं माझ्या घरांवर छापे टाकले, त्यावेळी माझ्या कुटुंबीयांनी, कर्मचाऱ्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना पूर्ण सहकार्य केलं. मी स्वत: सीबीआयच्या कार्यालयात दोनदा हजर राहून माझं म्हणणं मांडलं. अजूनही माझी याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. पण आज मी स्वत: ईडीच्या कार्यालयात हजर राहिलोय.”