मुंबई: राज्यातील वृत्तवाहिनीची पहाट खासदार संजय राऊत यांच्या विधानाने सुरू होत असते असे अनेकांचे म्हणणे असले तरी; त्याकडे आता बरेच जण दुर्लक्ष करायला लागले असतांना आज रोजी प्रथम प्रहरी संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांना एक फुकटचा सल्ला दिल्याने भाजपच्या गोटात अनेकांना या सल्ल्याने घाम फुटला आहे.
राज्यातील आज हजारो शिवसैनिक आमच्या पाठिशी उभे आहेत. पैसा, दहशतवादाच्या जीवावर आम्हाला कोणी विकत घेऊ शकणार नाही. त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसांना सल्ला देतो की तुम्ही या फंदात पडू नका, जे पहाटे झालं ना ते आता सायंकाळी होईल, भाजपची उरलीसुरली प्रतिष्ठा ते यात गमावून बसतील. तुमच्या नेतृत्वाला धक्का बसेल. ते विरोधी पक्षनेते आहेत. जरी ते आमचे राजकीय विरोधक असले तरी तरी त्यांच्याविषयी आम्हाला प्रेम आहे. असा सल्ला संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांनी दिला.
राज्यात येणाऱ्या काळात मोठा राजकीय भूकंप होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. शिवसेनेतील अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी जवळपास ४६ आमदारांना सोबत घेऊन आपला वेगळा गट स्थापन केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची चिंता वाढली आहे. एकनाथ शिंदे शिवसेनेला आणि महाविकास आघाडी सरकारला धक्क्यावर धक्के देत आहेत. याच पार्श्वभूमीवर आज संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसमोर येत प्रतिक्रिया दिली आहे.
दरम्यान, शिवसेना कुणी हायजॅक करु शकत नाही, गुवाहाटीला गेलेले आमदार मुंबईत आले की आमच्याकडेच येतील, असंही राऊत म्हणालेत. तसेच पुढे शिवसेना पार्टी ही आमच्या रक्तानं बनलेली आहे. फक्त कोणाकडं, तरी पैसा आहे म्हणून कोणी विकत घेऊ शकत नाही. आमच्यावर कोणतंही संकट नाही. आमच्यासाठी पक्षाच्या विस्ताराची ही संधी आहे. पक्षाचे विचार आणि भविष्यातील संधींवर आम्ही विचारमंथन करणार आहोत, असं म्हणत त्यांनी एकप्रकारे बंडखोरांना आव्हान दिल आहे.