भाजपचे फायर ब्रँड नेते किरीट सोमय्या यांनी सत्ताधारी पक्ष महाविकास आघाडीतील नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत पुरावे मिळवण्यासाठी धाडसत्र सुरु केलंय. या प्रकरणी सोमय्या यांनी काही दिवसांपूर्वी पुणे दौरा करत पत्रकार परिषद घेऊन शिवसेना खासदार भावना गवळी यांच्यावरील आरोपाबाबत भाष्य केलं होतं. त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही जरंडेश्वर साखर कारखाना प्रकरणी गंभीर इशारा दिला आहे. आता किरीट सोमय्या यांनी सोमवारी आणखी दोन नेते रडारवर असल्यांचं सांगितलं आहे.
शिवसेनेचा एक नेता आणि राष्ट्रवादीचा एक मंत्री माझ्या रडारवर आहेत, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. आज म्हणजेच सोमवारी यातील एका मंत्र्याचा भ्रष्टाचार माध्यमांसमोर उघडे करणार असल्याचेही सोमय्या यांनी सांगितलं होतं. यानंतर सबंध महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळामध्ये तर्क-वितर्क लावले जात होते.
अखेर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन तो राष्ट्रवादी काँग्रेसचा मंत्री कोण हे जाहीर केलं आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ यांनी मोठा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला आहे. त्यांच्यासह त्यांचे पुत्र नावीद मुश्रीफ, हसन मुश्रीफ यांच्या पत्नी या देखील या भ्रष्टाचारात सामील असल्याचं म्हटलं. सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्याच्या व्यवहारातून तब्बल १०० कोटींहून अधिकच भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप मुश्रीफ यांनी केला आहे.