ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याचा तुरुंगातील मुक्काम आणखी वाढला आहे. आर्यनला आज जामीन मिळेल, असं बोललं जात होतं. मात्र, एनसीबीने जामीनावर उत्तर देण्यासाठी एका आठवड्याचा वेळ मागितला. त्यावर न्यायालयाने एनसीबीला बुधवारपर्यंत वेळ दिला. आता बुधवारी आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.
एनडीपीएसच्या ज्या कलमातंर्गत गुन्हा दाखल झाला आहे. त्या कलमांतर्ग जामीन याचिकेवर सुनावणी घेण्याचा अधिकार नसल्याचं मुंबईतील कनिष्ठ न्यायालयाने स्पष्ट केलं होतं. त्यानंतर क्रूझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणात अटकेत असलेल्या मुलगा आर्यन खानच्या जामीनासाठी अभिनेता शाहरुख खानने मुंबई सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. आर्यनच्या जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. सत्र न्यायालयाचे न्यायाधीश व्ही.व्ही. पाटील यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. आर्यन खानच्या जामीन याचिकेवर उत्तर दाखल करण्यासाठी विशेष सरकार वकिलांनी उत्तर दाखल करण्यासाठी वेळ मागितला.
यावेळी वकील अमित देसाई यांनी आर्यन खानच्या वतीने न्यायालयात युक्तीवाद केला. ‘केवळ त्यांच्या प्रशासकीय कारणांमुळे, कुणाचं स्वातंत्र्यावर अंकुश ठेवू नये’, असं देसाई म्हणाले. एनसीबीने वेळ मागितल्यामुळे या प्रकरणाची सुनावणी आज दुपारी किंवा जास्तीत जास्त दुपारपर्यंत ठेवावी असा आग्रह देसाई यांनी केला. एनसीबीला एका आठवड्याचा वेळ देण्यास देसाई यांनी विरोध केला. देसाई न्यायालयात म्हणाले, ‘त्यांचा तपास सुरूच राहू शकतो. पण जिथपर्यंत या मुलाचा (आर्यन खान) संबंध आहे, तर त्याला जास्तीत जास्त एका वर्षाची शिक्षा होऊ शकते. त्याविरुद्ध कसलंही साहित्य नाहीये. त्याचबरोबर त्याच्याकडे कोणतेही पदार्थ सापडलेले नाहीत. त्यामुळे जर ते आणखी एका आठवड्याचा वेळ मागत असतील, तर हे फक्त एका वर्षाच्या शिक्षेसाठीचं आहे, ही वस्तुस्थिती लक्षात घ्यावी’, असा युक्तीवाद देसाईंनी न्यायालयात केला.
आर्यन खानच्या जामीनावर उत्तर देण्यासाठी एनसीबीने न्यायालयाकडे एका आठवड्याचा वेळ देण्याची विनंती केली. मात्र, न्यायालयाने केवळ दोन दिवसांचा वेळ दिला. त्यामुळे आर्यन खानच्या जामीनावर आता बुधवारी सुनावणी होणार आहे. मात्र, सुनावणी लांबल्यामुळे आर्यन खानचा तुरुंगातील मुक्कामही वाढला आहे.