शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला रविवारी (३ ऑक्टोबर), मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या क्रूझमध्ये सापडलेल्या अंमली पदार्थांच्या संदर्भात अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांप्रकरणी आर्यन खानची कसून चौकशी केली जात आहे. चौकशी दरम्यान आर्यनला अश्रू आवरता येत नाहीयेत, ज्यामुळे तो सातत्याने रडत आहे.
या चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे झाले आहेत. रविवारी रात्री उशिरा न्यायालयाने या तिन्ही आरोपींना एक दिवसाच्या एनसीबी कोठडीत पाठवले होते. एनसीबीने या प्रकरणी आणखी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे, ज्याला आज अटक केली जाऊ शकते. त्याचे नाव श्रेयस नायर असल्याचे म्हटले जात आहे. शिवाय एनसीबी त्यालाही न्यायालयात हजर करू शकते.
इतर देशांमध्येही केलंय आर्यनने अंमली पदार्थांचं सेवन
आर्यनने केवळ भारतातच नाही, तर भारताबाहेर यूके, दुबई किंवा इतर देशांमध्येही अंमली पदार्थांचं सेवन केल्याचं चौकशीत समोर आलं आहे. आर्यनसोबत अटक करण्यात आलेल्या अरबाजला तो १५ वर्षांपासून ओळखतो आणि दोघेही खूप चांगले मित्र आहेत.
शाहरुख खानशी फोनवर बोलला आर्यन
एनसीबीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ प्रकरणात आर्यनच्या अटकेनंतर कायदेशीर प्रक्रियेचा एक भाग म्हणून, एनसीबीने आर्यनला त्याचे वडील शाहरुख खानशी त्यांच्या लँडलाईनवरून २ मिनिटे फोनवर बोलू दिले आहे.
चौकशी दरम्यान सातत्याने रडत आहे आर्यन
एनसीबीसोबत सुरू असलेल्या चौकशीत आर्यन खान खूप भावनिक होत आहे आणि सतत रडत आहे.
4 वर्षांपासून अंमली पदार्थांचं सेवन करतोय आर्यन
शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याची चौकशी केली जात आहे. अंमली पदार्थ प्रकरणात अनेक मोठ्या गोष्टी बाहेर येत आहेत. आता नवीन माहितीनुसार, एनसीबीच्या चौकशीत हे समोर आले आहे की, आर्यन खान जवळजवळ ४ वर्षांपासून अंमली पदार्थांचं सेवन करत आहे.
अंमली पदार्थ प्रकरणात अनेक ठिकाणी सुरू आहे कारवाई
मुंबई एनसीबीचे प्रमुख समीर वानखेडे यांनी अंमली पदार्थ प्रकरणासाठी केलेल्या विशेष संभाषणात सांगितले की, “आम्ही या प्रकरणात एकूण ८ जणांना अटक केली आहे. त्या सर्वांना अंमली पदार्थांच्या वापरासाठी आणि पुरवठ्यासाठी त्या क्रूझवर आणण्यात आले होते. ८ पैकी ३ आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे, तर इतर ५ जणांनाही न्यायालयात हजर केले जाईल. एनसीबीची कार्यवाही अजूनही सुरू आहे. अजूनही अनेक ठिकाणी कारवाई चालू आहे.