हायकोर्टातही लगेच दिलासा नाही
ड्रग्ज पार्टी प्रकरणात NCB च्या अटकेत असलेल्या आर्यन खानच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचं नाव घेत नाहीयेत. बुधवारी मुंबईच्या सत्र न्यायालयाने आर्यनचा जामीन अर्ज फेटाळल्यामुळे त्याचा आर्थर रोड जेलमधला मुक्काम वाढला. यानंतर आर्यनच्या वकीलांनी जामीनासाठी हायकोर्टात धाव घेतली.
परंतु हायकोर्टातही आर्यन खानला लगेच दिलासा मिळालेला नाही. मुंबई हायकोर्ट २६ ऑक्टोबरला आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी करणार आहे. आर्यनच्या वकीलांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी करण्याची विनंती हायकोर्टाने फेटाळली आहे. त्यामुळे आर्यनला तोपर्यंत आर्थर रोड तुरुंगातच रहावं लागणार आहे. २६ तारखेला मुंबई हायकोर्टात जस्टीस एन.डब्ल्यू.सांबरे यांच्यासमोर आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी होईल. आर्यनचे वकील सतीश मानेशिंदे यांनी याबद्दल माहिती दिली.
१४ तारखेला मुंबईच्या विशेष NDPS कोर्टात आर्यनच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर कोर्टाने निकाल राखून ठेवला होता. २० तारखेच्या सुनावणीत आर्यनला जामीन मिळेल अशी सर्वांनाच आशा होती. परंतु निकाल देताना कोर्टाने जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे २६ तारखेला हायकोर्टासमोर सुनावणीत नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.