पंजाब नॅशनल बँकेची तब्बल दहा हजार कोटींहून अधिक रुपयांची फसवणूक करून फरार झालेल्या नीरव मोदीपेक्षा मोठा घोटाळा समोर आला आहे. मागील काही महिन्यांपासून चर्चेत असलेल्या बाईक बोट घोटाळ्यामध्ये तब्बल 15 हजार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. नीरव मोदी व मेहूल चोक्सीने केलेल्या घोटाळ्यापेक्षा हा घोटाळा मोठा आहे.
सीबीआयने बाईक बोट घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेशातील बाईक बोट कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय भाटी यांच्यासह चौदा जणांना आरोपी करण्यात आले आहे. कंपनीने देशभरातील गुंतवणूकदारांची पंधरा हजार कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. नीरव मोदी व मेहूल चोक्सी यांनी पंजाब बँकेला सुमारे दहा हजार कोटी रुपयांना फसवले आहे.
बाईक बोट कंपनीने गुंतवणुकीसाठी बाईक-टॅक्सी नावाची योजना आणली होती. त्यामध्ये ग्राहकांना एक, तीन, पाच किंवा सात बाईकसाठी पैसे गुंतवता येणार होते. या बाईकची देखभाल व चालवण्याची जबाबदारी कंपनीवर होती. ग्राहकांना महिन्याला त्याचे भाडे, हप्ते व बोनस दिला जात होता. या आकर्षक योजनांचे अमिष दाखवून ग्राहकांना जोडले जात होते. नोव्हेंबर 2018 मध्ये ही योजना सुरू करण्यात आली होती.
ग्राहकांकडून या योजनेत एका व्यक्तीकडून 62 हजार 200 रुपये गुंतवणूक स्वरूपात घेण्यात आले. या बदल्यात कंपनीने वर्षभर ग्राहकांना 9 हजार 765 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते. पण तसे काहीच झाले नाही. गुंतवणुकदारांचे पैसे घेऊन कंपनीचे संचालक फरार झाले. लाखो लोकांनी या योजनेत पैसे गुंतवले होते. हा घोटाळा समोर आल्यानंतर ईडीनेही तपास सुरू केला होता. ईडीने 216 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.