बीड: जि. प. माध्यमिक कन्या शाळा गेवराईच्या सहशिक्षीका राजश्रीताई मिसाळ ढाकणे यांच्या ‘अंतरीच्या वेदना’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे नागपूर येथे थाटात प्रकाशन झाले. त्यांना साहित्य सेवा सन्मान पुरस्कार २०२१ ने गौरविण्यात आले असून साहित्य क्षेत्रात त्यांनी पुरस्काराची हैट्रीक प्राप्त केली असल्याने शैक्षणिक व साहित्य वर्तुळात त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
राजश्रीताई यांनी ज्ञानदानाच्या पवित्र कार्यात विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण,आनंददायी, ज्ञानरचनादी शिक्षण दिले आहे.त्यांच्या बीड जिल्हा परिषदेच्या २४ वर्षाच्या कालावधीत सन २०१८ -१९ मध्ये पहिल्याच प्रयत्नात तीन विद्यार्थी शिष्यवृत्ती धारक झाले. वृक्षारोपण,स्वच्छ भारत अभियान, प्लॅस्टिक मुक्ती यासारख्या अभियानात त्या नेहमीच सहभागी असतात..शासनाच्या विविध योजनांचा पालकांना लाभ मिळवून तर देतातच पण वर्गातील गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत करत असतात.
शैक्षणिक कार्याबरोबरच त्यांनी वेळोवेळी सामाजिक संघटनांची पदे भूषवून सामाजिक बांधिलकी जपताना अनेक सामजिक उपक्रम राबवले त्यामुळे त्यांना २०१९ला स्वाभिमानी प्राबोधनीचा राज्यस्तरीय “समाजभूषण” पुरस्कार प्राप्त झालेला आहे. सतत कार्यमग्नता आणि नाविन्याचा ध्यास त्यांना लागलेला असल्यामुळे त्यांचे साहित्यिक क्षेत्रातील योगदानही महत्त्वपूर्ण आहे…!…त्यांचे लिखाण वास्तवाची झालर असलेले ,अन्यायाला वाचा फोडणारे, निर्भीड आणि सत्याची कास धरणारे,संवेदनशील असल्यामुळे ते वाचकांच्या मनाचा ठाव घेतल्याशिवाय राहत नाही…त्यांच्या कथा,कविता,चारोळी,गझल, ललितलेखन आणि हायकू काव्य हा जपानी काव्यप्रकार देखील वाचनीय असून त्यांनी अनेक स्पर्धात सहभागी होऊन सर्वोत्कृष्ट स्थानी विराजित झालेल्या आहेत…शेकडो प्रमाणपत्र त्यांच्या संग्रही आहेत. नियमित मराठी भाषा सक्षमीकरणातील योगदानाबद्दल त्यांनी साहित्यिक पुरस्काराची काल दिनांक २९/०८/२०२१ रोजी हैट्रिक केली आहे.
काळजाचा ठाव घेणारी त्यांची लेखणी दिवसेंदिवस प्रसिध्दीच्या उंच शिखरावर विराजमान होत आहे. सलग तीन वर्षे त्यांनी राज्यस्तरीय "काव्यरत्न २०१९", "कुसुमाग्रज २०२०", आणि "साहित्य सेवा सन्मान २०२१ " असे सलग तीन वर्षे साहित्यिक पुरस्कार मिळवून त्यांनी हैट्रिक केली आहे. मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर आयोजित दिनांक २९/०८/२०२१ ला नागपूर नगरीत काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा, काव्यसंमेलन व राज्यस्तरीय "साहित्य सेवा सन्मान पुरस्कार २०२१" प्राप्त म्हणजे दुग्ध शर्करा योगच ...! खरं म्हणजे कवयित्री सौ.राजश्रीताईंनी हैट्रिकपूर्ती करत आपले साहित्यिक योगदान सिध्द केले आहे.त्यांच्या शैक्षणिक,सामाजिक आणि साहित्यिक प्रवासाचे आणि पुरस्काराचे सर्वत्र कौतुक होत आहे. साहित्य सेवा सन्मान पुरस्कार जाहीर झाल्यापासूनच त्या अभिनंदनाच्या वर्षावात चिंब भिजत आहेत.
त्यांचा पहिलाच काव्यसंग्रह "अंतरीच्या वेदना" याच नागपूर नगरीत मोठ्या थाटात प्रकाशन सोहळा पार पडला. त्यांच्या लेखणीचे माहेर म्हणजे शिलेदार समूह आहे. यासमूहाचे मुख्य प्रशासक आदरणीय राहुलदादा पाटील, संस्थेच्या सचिव पल्लवीताई पाटील, शिलेदार समूहाचे विश्वस्त आदरणीय अरविंददादा उरकुडे, अशोकदादा लांडगे, सर्व सहप्रशासक, मुख्य परीक्षक,संकलक आणि सर्व शिलेदार परिवाराचे त्यांनी याप्रसंगी ऋण व्यक्त केले.काल दिनांक २९/०८/२०२१ रोजी मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर आयोजित काव्यसंग्रह प्रकाशन कार्यक्रमात तब्बल १८ पुस्तकांचे प्रकाशन अध्यक्ष प्रसिद्ध नाटककार व लेखक दादाकांत धनविजय,प्रमुख मार्गदर्शक डॉ.अनिल पावशेकर व प्रा.आनंद मांजरखेडे तसेच अतिथी मयुर निमजे, अंकुश केदार, सचिन गावखडकर, पत्रकार रेणुका किन्हेकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते थाटात साजरे झाले. तब्बल ३० कवी/कवयित्री दादा ताईंना याच अतिथी गणाकडून "साहित्य सेवा सन्मान पुरस्कार २०२१" या साहित्यिक पुरस्काराने गौरविण्यात आले. उपस्थित सर्व कवी /कवयित्रीच्या काव्यानी नागपूर नगरी गंधित होवून काव्यरसिकांची मने जिंकली...!!!..या अभूतपूर्व त्रिवेणी संगम असलेल्या सोहळ्याचे आयोजक,संयोजक शिलेदार परिवाराचे प्रमुख आदरणीय राहुलदादा पाटील यांनीच बहारदार सूत्रसंचलन केले;तर आभारप्रदर्शन कवयित्री /अभिनेत्री/चित्रपट निर्माती प्राजक्ताताई खांडेकर यांनी मानले.
राजश्रीताईंचा काव्यसंग्रह "अंतरीच्या वेदना"नक्कीच काव्य रसिकांना आवडेल आणि त्यांच्या लेखणीला सर्वांचे शुभेच्छारुपी आशीर्वाद,पाठबळ मिळेल अशी त्यांना आशा आहे...!