नवी दिल्ली – राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज जल व्यवस्थापन क्षेत्रातील अनुकरणीय कार्यासाठी राष्ट्रीय जल पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. त्याचबरोबर दैनंदिन जीवनात तसेच आपल्या धरेवर पाण्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी जल मोहिमेचा विस्तारही करण्यात आला.
‘जल शक्ती अभियान: वर्षा जलसंधारण (कॅच द रेन) 2022’ ची सुरुवात करताना करताना खूप आनंद होत आहे असे प्रतिपादन राष्ट्रपतींनी केले. जलसंधारणाच्या कामात प्रत्येक व्यक्तीचा सक्रिय सहभाग असावा यासाठी स्थानिक जनतेला प्रेरित करण्याकरता जिल्हा दंडाधिकारी आणि गावच्या सरपंचांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली पाहिजे असेही ते म्हणाले.
निसर्गाने मानवाला जलस्त्रोतांचे वरदान दिले आहे. त्याने आपल्याला विस्तीर्ण नद्या दिल्या आहेत, त्यांच्या काठावर महान संस्कृतींचा विकास झाला. भारतीय संस्कृतीत नद्यांना अनन्यसाधारण महत्त्व असून त्यांची माता म्हणून पूजा केली जाते. उत्तराखंडमधील गंगा आणि यमुना, मध्य प्रदेशातील नर्मदा आणि बंगालमधील गंगा-सागर या नद्या, आपण पूजेसाठी समर्पित ठिकाणे ठेवली आहेत.
अशा धार्मिक प्रथा आपल्याला निसर्गाशी जोडून ठेवतात. तलाव आणि विहिरींचे बांधकाम हे पुण्यपूर्ण कार्य मानले जात असे. दुर्दैवाने आधुनिकता आणि औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या आगमनाने आपण निसर्गाशी असलेला संबंध गमावला आहे. ज्या निसर्गाने आपल्याला टिकवून ठेवले आहे त्यापासून आपण तुटलो आहोत असे आढळते.
आपल्या देशात जगाच्या लोकसंख्येपैकी 18 टक्के लोकसंख्या आहे, तर आपल्याकडे फक्त 4 टक्के गोड्या पाण्याचे स्रोत आहेत. पाण्याची उपलब्धता अनिश्चित आहे आणि ती बऱ्याच अंशी पावसावर अवलंबून असते, याचा परिणाम शेतकरी, महिला आणि गरिबांच्या जीवनावर होत आहे असे राष्ट्रपती म्हणाले.