मुंबई :- महाराष्ट्रातील राज्यसभेच्या निवडणुकीत ६ जागांसाठी ७ उमेदवार मैदानात असल्याने व उमेदवार निवडून येण्यासाठी अतिरिक्त मतं पुरेशी नसतानाही भाजपा आणि शिवसेनेने उमेदवार दिल्याने निवडणूक अटीतटीची झाली आहे.
समर्थक आणि अपक्ष आमदारांना सोबत ठेवण्यासाठी मविआ व भाजपाची संपर्क मोहीम जोरात सुरु आहे. या संपर्क मोहिमेत आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हॉटेल ट्रायडंट येथे माविआ समर्थक आमदारांची बैठक घेतली. मात्र, या बैठकीला प्रहार क्रांती संघटनेचे अध्यक्ष व राज्यमंत्री बच्चू कडू यांनी दांडी मारली. तर अबू आझमीही गैरहजर असल्याचे दिसून आले. यामुळे शिवसेनेचे टेंशन वाढले आहे. बच्चू कडू यांच्यासह त्यांच्या संघटनेचे दोन आमदार आहेत. कडू यांनी हरभरा आणि धानासाठी अनुदानाची मागणी केली आहे. त्यावरून त्यांनी नुकतेच सुचक वक्तव्यही केले होते.
अबू आझमीही गैरहजर
समाजवादी पक्षाने देखील शिवसेनेची काळजी वाढवली आहे. समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहून कळवले आहे की, पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हेच याबाबत निर्णय घेणार आहेत. या बैठकीला न जाण्याचा निर्णय अबू आझमी यांनी घेतला आहे. आझमी यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फोनही केला होता. पण, आझमी यांनी फोनला उत्तर दिले नाही. भाजप नेत्यांकडूनही आझमी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू आहे. यावर बोलताना आझमी म्हणाले की, शिवसेनेने अडीच वर्षात आमच्यासाठी काय केले? आमच्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या नाहीत. महाविकास आघाडीच्या आमदारांच्या बैठकीला आम्ही जाणार नाही.