राज्यातील आरोग्य विभागाच्या पदांवर भरती प्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. आता या परीक्षा दिनांक २४ ऑक्टोबर आणि ३१ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. पण परीक्षेच्या या नवीन तारखांची घोषणा करताच समस्या उभा झाल्या आहे. कारण ३१ ऑक्टोबरला आरोग्य विभागाची भरती परीक्षा आणि शिक्षक पात्रता परीक्षा या दोघांचाही परीक्षा एकाच दिवशी आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
यावर प्रतिक्रिया देतांना आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले कि, “३१ ऑक्टोबर रोजी आरोग्य विभाग आणि शिक्षक पात्राता परीक्षा एकत्र आल्या आहेत. मी याबाबत शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याशी बोललो आहे. आरोग्य विभागाची परीक्षा तातडीची आहे, त्यामुळे शिक्षक पात्रता परीक्षेच्या तारखेबाबत विचार करावा, अशी विनंती मी केली आहे”, असे टोपे म्हणाले. यातून मार्ग काढला जाईल आणि विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी सरकार घेईल असेही ते पुढे म्हणाले.
सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने गट- क आणि गट- ड साठी होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. लेखी परीक्षा घेण्याचे काम मे. न्यासा या संस्थेला देण्यात आले होते. त्या संस्थेने आम्हाला पूर्वतयारीसाठी आणखी वेळ हवा आहे, असे म्हणत ऐनवेळी परीक्षा घेण्यास नकार दिला. पण आता परत परीक्षा घेण्याचे काम सरकारने न्यासा कंपनीला दिले आहे. या कंपनीचा पूर्वइतिहास वादाचा आहे. पंजाब परीक्षेकरिता नीट काम न केल्या बद्दल या कंपनीला काळ्या यादीत टाकण्यात आले होते.
कोरोना काळात काम करण्यासाठी आरोग्य विभागास अधिक सक्षम करण्याचा शासनाने निर्णय घेतला होता. त्याकरिता मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागात भरती करण्याकरिता शनिवार २५ सप्टेंबर आणि रविवारी २६ सप्टेंबर रोजी शासनाकडून परीक्षा घेण्यात येण्यात होती. पण ती रद्द करण्यात आली होती.