मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्या प्रकरणात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाडमध्ये प्रथम वर्ग न्याय दंडाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांना जामीन मंजूर केला आहे. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर राणे यांना जामीन देण्यात आलाय. मात्र, 30 ऑगस्ट आणि 13 सप्टेंबरला रायगड गुन्हे शाखेत हजेरी लावावी लागणार आहे. या दरम्यान, कागदपत्रे आणि पुराव्यांसोबत छेडछाड करता येणार नाही, असंही महाड कोर्टानं राणेंना बजावलं आहे. राणे यांना जामीन मंजूर झाल्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवला आहे. परिवहन मंत्री अनिल परब आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याविरोधात कोर्टात जाणार असल्याचा इशाराही यावेळी पाटील यांनी दिलाय.
आम्हाला खात्री होती सत्याचा विजय होणार, पोलीस आणि गुंडांच्या मदतीने हे राज्य सुरु आहे. सारखं पोलिसांच्या मदतीने लोकांना अडचणीत आणण्याचे प्रयत्न करतात. हे कोर्टात जाऊन थपडा खातात. जेवणासारखं थपडांचीसुद्धा त्यांना आवश्यकता झालेली आहे. ज्या खाल्ल्या शिवाय त्यांना झोप लागत नाही. हे अमानवीय कृत्य झालं. जेवताना राणेंना उठवलं गेलं. सामान्य माणसाशीसुद्धा असा व्यवहार करायचा नसतो. त्यांचा नंतर बीपी वाढला. शुगर वाढली. त्यांना रुग्णालयात नेलं नाही. हे काय चाललं आहे. जी सत्ता अकृत्रिमपणे मिळवली त्या सत्तेची एवढी नशा. यांचं हम करेसो कायदा असं सुरु आहे. हे प्रत्येक विषयावर थपडा खातात. अनिल परब यांना आम्ही कोर्टात खेचणार असल्याचे चंद्रकात पाटील म्हणाले.