नागपूर :संत्रानगरीतील कला क्षेत्रातील नावाजलेलं व्यक्तिमत्व आणि कस्तुरी फिल्म इंटरटेन्मेंट वर्ल्ड च्या संचालिका, चित्रपट निर्माती, गायिका, निवेदिका व प्रसिद्ध कवयित्री प्राजक्ता खांडेकर, नागपूर यांच्या तिस-या ‘बकुळगंध’ कविता संग्रहाचे संग्रहाचे लोकार्पण ‘मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर सभागृह नागपूर येथे (दि २९) उत्साहात संपन्न झाले. त्यांना यावर्षीचा मराठी साहित्य लेखनाचा ‘साहित्य सेवा सन्मान’ पुरस्कार देऊन संस्थेचे अध्यक्ष राहुल पाटील यांनी सन्मानित केले.
प्राजक्ता खांडेकर या मागील ५ वर्षापासून शैक्षणिक, कविता व साहित्य क्षेत्रात मराठी भाषेच्या संवर्धनार्थ मराठीचे शिलेदार समूहासाठी अविरत कार्यरत आहेत. त्यांचे भाषेसाठीचे योगदान अतुलनीय असून, शैक्षणिक दर्जा अधिकाधिक वृद्धिंगत होण्यासाठी त्या नवनवीन उपक्रम समूहासाठी तयार करीत असतात. तसेच समूहाच्या सर्व साप्ताहिक काव्यस्पर्धेत सहभागी होऊन मोलाचे कार्य करत आहेत. गतसाली मराठीचे शिलेदार संस्थेने त्यांचा ‘जीवन गौरव पुरस्कार’ देऊन यथोचित सन्मान केला आहे.
प्राजक्ता खांडेकर यांचे यापूर्वी ‘कस्तुरीगंध’, ‘प्राजक्तगंध’ हे दोन कविता संग्रह प्रकाशित झाले असून, लवकरच ११११ रचनांचा चारोळी संग्रह काढण्याचा मानस आहे. त्यांच्या ‘प्रेमी लागे जीवा’ हा चित्रपट प्रदर्शनाच्या मार्गावर असून त्यांची प्रमुख भूमिका असलेली शॉर्ट फिल्म ‘आधार’ मागील महिन्यात प्रदर्शीत झाली आहे.
मराठीचे शिलेदार बहुउद्देशीय संस्था नागपूर आयोजित काव्यसंग्रह प्रकाशन समारंभात कवयित्री प्राजक्ता खांडेकर यांच्या ‘स्मृतिगंध’ कविता संग्रहासोबतच तब्बल १७ पुस्तकांचे प्रकाशन अध्यक्ष श्री.दादाकांत धनविजय,प्रमुख मार्गदर्शक श्री. डॉ.अनिल पावशेकर व प्रा.आनंद मांजरखेडे तसेच अतिथी मा.मयुर निमजे, डॉ सोहन चवरे, पत्रकार कु.रेणुका किन्हेकर या सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी राज्यातील ३० कवी कवयित्रींना “साहित्य सेवा सन्मान पुरस्कार २०२१” देऊन सन्मानित करण्यात आले. समारभांचे सूत्र संचालन राहुल पाटील यांनी केले तर आभार प्राजक्ता खांडेकर यांनी मानले.