त्रिपुरा घटनेचे पडसाद सध्या महाराष्ट्राच्या काही शहरामध्ये पहायला मिळत आहे. काल दंगल सदृश्य स्थिती होती. ह्या सर्व घटनेच्या पाठीमागे रजा अकादमी असून तिच्यावर बंदी घाला, नाही तर महाराष्ट्राच्या भल्यासाठी आम्ही त्यांना संपवू असा इशाराच आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी दिलाय.
राणे यांनी ट्विट करत इशारा दिला आहे. नितेश राणे हे सध्या आक्रमक झालेले दिसतायेत आणि या सोबतच राणे यांनी मुंबईत आझाद मैदानात सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर देखील टीका केली.
त्रिपुरा राज्यात सुरु असलेल्या हिंसाचाराच्या अफवाचे लोण आता महाराष्ट्रात पसरले आहे. त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात तीव्र पडसाद मुस्लिम धर्मीयांमध्ये उमटत आहेत. या विरोधात रजा अकादमी आक्रमक झाली असून भिवंडीत रजा अकादमीचे अध्यक्ष शकील रजा यांनी भिवंडी बंदचे आवाहन केल्याने शहरातील विविध मुस्लिम मोहल्ल्यां मध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. मात्र शहरातील प्रभुआळी मंडई, बाजारपेठ या भागात दुकान बंद न झाल्याने एका मोटारसायकल वर आलेल्या टोळीने व्यापाऱ्यांची जबरदस्ती दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी विरोध करून पोलिसांना माहिती देताच या टोळीने घटनास्थळावरुन पळ काढला.
नांदेड शहरात देखील याचे पडसाद उमटले. शहरातल्या शिवाजीनगर, केळी मार्केट, देगलूर नाका परिसरात तुफान दगडफेक करण्यात आली. व्यावसायिकांच दुकानं आणि खासगी वाहनांसह पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड करण्यात आली. त्यामुळं दंगल नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे. दगडफेक करतानाची दृश्यं सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.