भारतात तसेच जगभरात कोट्यवधी चाहते असणाऱ्या बिग बी अमिताभ बच्चन यांचा आज वाढदिवस आहे. सध्या बिग कौन बनेगा करोडपती या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनासह, सोशल मीडियावरवरही सतत सक्रिय असतात. ते नेहमीच आपल्या कृतींनी आपल्या चाहत्यांना वेड लावत असतात. आता त्यांच्या अशाच एका कृतीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन कार्यक्रम अर्थात नॅशनल ऑर्गनायझेशन ऑफ टोबॅको इरॅडिकेशन यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत बिग बी यांनी कमला पसंद पानमसाला कंपनीसोबतचा करार रद्द केला आहे. आणि या कंपनीसोबतच्या कराराची उर्वरित रक्कमही त्यांनी कंपनीला परत केली आहे. त्यांच्या या कृतीचे सर्व स्तरातून स्वागत होते आहे.
राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन कार्यक्रमाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शेखर साळकर यांनी २२ सप्टेंबर २०२१ रोजी अमिताभ बच्चन याना अशाप्रकारच्या जाहिरातीतून माघार घेण्यासंदर्भात आवाहन करणारे एक पत्र लिहिले होते. जे माध्यमातून प्रसिद्धही करण्यात आले होते. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत त्यांनी हा करार रद्द केला आहे.
अमिताभ बच्चन यांच्या विषयी ‘या’ गोष्टी माहिती आहेत का?
अमिताभ बच्चन यांच्या निर्णयाचा मला आनंद झाला आहे आणि याचा समाजावर नक्कीच सकारात्मक परिणाम होईल अशी मला आशा आहे. त्यांच्या या निर्णयाचे इतर सिनेअभिनेते अनुकरन करतील अशीही अपेक्षा आहे, अशा भावना डॉ. साळकर यांनी व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रीय तंबाखू निर्मूलन कार्यक्रम हा देश तंबाखूमुक्त करण्याच्या अनुषंगाने राबविला जात आहे. त्यासाठी विविध पातळीवर जागृती केली जात आहे. त्यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनाही गोव्यात अशा प्रकारच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची विनंती केली आहे.