पाटणा: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज पाटणा येथे बिहार विधानसभेच्या शताब्दी सोहळ्याच्या समारोप समारंभाला संबोधित केले. बिहार विधानसभेच्या 100 वर्षांच्या स्मृतीप्रित्यर्थ बांधण्यात आलेल्या शताब्दी स्मृती स्तंभाचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. तसेच विधानसभा संग्रहालयाची पायाभरणीही त्यांनी केली. संग्रहालयातील विविध गॅलरी बिहारमधील लोकशाहीचा इतिहास आणि सध्याच्या नागरी संरचनेची उत्क्रांती यांचे दर्शन घडवतील. इथे 250 पेक्षा जास्त आसन क्षमता असलेले संमेलन सभागृह (कॉन्फरन्स हॉल) देखील असेल. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते विधानसभा अतिथीगृहाचे भूमिपूजनही करण्यात आले. यावेळी बिहारचे राज्यपाल फागु चौहान आणि मुख्यमंत्री नितीश कुमार उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधान म्हणाले की, बिहारचा हा स्वभाव आहे की जो बिहारवर प्रेम करतो, बिहार ते प्रेम अनेक पटींनी परत करतो. “आज मला बिहार विधानसभा परिसराला भेट देणारा देशाचा पहिला पंतप्रधान होण्याचा बहुमानही मिळाला आहे. या स्नेहाबद्दल मी बिहारच्या जनतेला प्रणाम करतो,” असे ते म्हणाले. शताब्दी स्मृती स्तंभ बिहारच्या असंख्य आकांक्षांना प्रेरित करेल असे पंतप्रधान म्हणाले.
स्वातंत्र्यानंतर या विधानसभेत जमीनदारी निर्मूलन कायदा मंजूर करण्यात आला. ही परंपरा पुढे नेत, नितीशजींच्या सरकारने बिहार पंचायती राज सारखा कायदा पारित करून बिहार हे पंचायतींमध्ये महिलांना 50 टक्के आरक्षण देणारे पहिले राज्य बनवले याचे स्मरण त्यांनी करून दिले.
“लोकशाहीपासून सामाजिक जीवनापर्यंत समान सहभाग आणि समान अधिकार यांचा कसा पाठपुरावा केला जातो याचे उदाहरण ही विधानसभा आहे”असे पंतप्रधान म्हणाले.
पंतप्रधानांनी भारतीय लोकशाहीची प्राचीन परंपरा अधोरेखित केली . ते म्हणाले, “परकीय राजवट आणि परकीय विचारसरणीमुळे भारताला लोकशाही मिळाली हे आपल्याला सांगण्याचा गेली अनेक दशके प्रयत्न केला जात आहे. मात्र , जेव्हा एखादी व्यक्ती असे म्हणते तेव्हा ती बिहारचा इतिहास आणि बिहारचा वारसा लपवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा जगातले मोठे भूभाग सभ्यता आणि संस्कृतीच्या दिशेने आपले पहिले पाऊल टाकत होते , तेव्हा वैशालीमध्ये एक सुसंस्कृत लोकशाही कार्यरत होती. जगातील इतर भागात लोकशाही अधिकारांची समज विकसित होऊ लागली तेव्हा लिच्छवी आणि वज्जीसंघ सारखे प्रजासत्ताक परमोच्च बिंदूवर होते.
भारतातील लोकशाहीची संकल्पना, आपल्या देशाइतकीच प्राचीन आहे, आपल्या संस्कृतीइतकी प्राचीन आहे. भारत लोकशाहीला समता आणि समानता निर्माण करण्याचे साधन मानतो. भारताचा सहअस्तित्व आणि सौहार्दाच्या कल्पनेवर विश्वास आहे. आमचा सत्यावर विश्वास आहे, आमचा सहकार्यावर विश्वास आहे, आमचा समरसतेवर विश्वास आहे आणि आमचा समाजाच्या एकसंध शक्तीवर विश्वास आहे”, असे पंतप्रधान यावेळी म्हणाले.