CDS जनरल बिपिन रावत यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले. आता लष्कर प्रमुख मनोज नरवणे सीडीएस होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. CDS जनरल बिपिन रावत यांच्या निधनावर सगळीकडून शोक व्यक्त होत आहे. CDS रावत यांचे हेलिकॉप्टर तामिळनाडूमधील कुन्नूरजवळ क्रॅश झाले. यामध्ये जनरल रावत त्यांच्या पत्नीसह 14 जण होते. हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपिन रावत यांचे निधन झाले तर पत्नी मधुलिका आणि लष्करातील 11 अधिकारी आणि जवानांचाही मृत्यू झाला. ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांच्यावर उपचार सुरू आहेत.
बिपिन रावत यांच्या जागी नरवणे यांची नियुक्ती?
सर्वाधिक सैन्यबळ आर्मीकडे असल्यामुळे मनोज नरवणे यांना सीडीएसची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, एअरचीफ मार्शल विवेक चौधरी यांनी घटनास्थळी पाहणी केली आहे. जनरल रावत यांच्या अपघातस्थळी ते पाहणी करणार आहेत. हेलिकॉप्टर अपघातप्रकरणाची वायुदलाकडून चौकशी सुरू आहे. वायुदलप्रमुखांनी अपघाताच्या जागेची पाहणी आहे. जनरल बिपिन रावत यांच्या निधनाचा धक्का संपूर्ण देशाला बसला आहे. बिपिन रावत यांच्यावर उद्या अंत्यसंस्कार होणार आहे.
नरवणे यांच्या नावाची चर्चा का?
सध्या नरवणे हेच देशाचे सर्वोच्च लष्करी अधिकारी आहेत. त्यातही जनरल रावत यांनी गेल्या काही काळात सीडीएस म्हणून जे काही प्रोजेक्ट सुरु केलेत, काम हाती घेतलेत, त्याची माहिती आणि अनुभव हा सर्वाधिक जनरल नरवणे यांना आहे. नरवणे हे सध्याचे लष्करप्रमुख आहेत. सीडीएसच्या पदासाठी जनरल नरवणे हेच दावेदार आहेत. तसेच त्यांच्याकडे मोठा अनुभव आहे. त्यांचे नाव आघाडीवर आहे.
दरम्यान, जनरल नरवणे हे पुढच्या वर्षी एप्रिलमध्ये निवृत्त होणार आहेत. लष्करप्रमुख म्हणून त्यांचा कार्यकाळ एप्रिलमध्ये संपतोय. लष्करी नियमानुसार सीडीएसला 65 वर्ष वयापर्यंत त्या पदावर रहाता येते. तर इतर तीनही सैन्यदल प्रमुखांना वयाच्या 62 वर्षापर्यंत त्या पदावर रहाता येते. जनरल नरवणे निवृत्त झाल्यानंतर सीडीएस पदावर रहाण्यासाठी सर्व पात्रता पूर्ण करतात. त्यामुळे त्यांच्या नावाची चर्चा आहे.