देशात तब्बल ३७८ दिवस झालेलं राजधानी दिल्लीतील शेतकरी आंदोलन, त्यानंतर मोदी सरकारने घेतलेली शरणागती, कोरोनाने देशात केलेला हाहाकार आणि त्यातून झालेलं मृत्यूतांडव आणि महागाईचा उडालेला भडाका, टोकदार होत चाललेल्या जातीय आणि धार्मिक अस्मिता या सर्वांच्या पार्श्वभूमीवर पाच राज्यांमधील निवडणूक पार पडल्या. या निवडणुकीची मतमोजणी आज पार पडत आहे.
सकाळी ८ वाजता मतमोजणीस प्रारंभ झाला असून सुरुवातीच्या दोन तासांमध्ये भाजपने ५ पैकी ४ राज्यात आघाडी घेत बाजी मारली आहे. उत्तर प्रदेशात बहुमताची आघाडी (२०३ जागांवर) भाजपने घेतली असून समाजवादी पक्ष १०० जागांवर आघाडी घेतली आहे. अर्थातच हा सुरुवातीची आकडेवारी असल्याने यामध्ये बदल होऊ शकतो.
उत्तर प्रदेश
देशात सत्ता कोणाची येणार हे ठरवणाऱ्या उत्तर प्रदेशात आज विधानसभा निवडणूक मतमोजणी होत आहे. भाजपने उत्तर प्रदेशात २२२ जागांवर आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्षाने १११ जागांवर आघाडी घेतली आहे. समाजवादी पक्षाचे करहालमधून अखिलेश यादव आघाडीवर आहेत. गोरखपूरमधून योगी आदित्यनाथही आघाडीवर आहेत.