सध्या देशात इंधन दरवाढ हा ज्वलंत विषय असून पेट्रोल आणि डिझेलचे दर रोज वाढत आहेत. मागील २० दिवसांमध्ये तब्बल १५ वेळा इंधन दरवाढ झाली आहे. सर्वसामान्यांना या इंधन दरवाढीचा फटका बसत आहे. सध्या तरी इंधनाचे दर कमी होण्याची काही चिन्ह दिसत नाहीत. सर्व सामान्यांमध्ये या इंधन दरवाढीबद्दल चिंतेचा स्वर उमटताना दिसत आहे. पण ही दरवाढ योग्य किंवा अनिवार्य असल्याचे खुलासा करताना सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे नेते मनाला वाटेल ते स्पष्टीकरण देत आहेत.
भाजप नेत्यांनी यापूर्वी तालिबानला दोष देणे, मोफत लस दिल्यामुळे इंधन भडका झाला म्हणणे किंवा इंधनाचे दर वाढले आहेत, तर सायकल चालवा, ती आरोग्यासाठी फायद्याची असते, असे युक्तीवाद करण्याचे प्रकार केले आहेत. पण आता याच अजब युक्तीवादामध्ये आणखीन एका विचित्र वक्तव्याची भर पडली आहे. आसामचे भाजपचे अध्यक्ष यांनी ही भर पाडली आहे.
पेट्रोलच्या दरांसंदर्भात भाष्य करताना आसाम भाजपचे अध्यक्ष भाबेश कालिता यांनी अजब दावा केला आहे. पेट्रोलचे दर २०० रुपये लिटरच्या पुढे गेल्यास ट्रीपल सीट प्रवास करण्याची मूभा आसाममध्ये देण्यात येईल असे त्यांनी म्हटले आहे. पेट्रोलचे दर लिटर मागे २०० रुपयांवर पोहचल्यानंतर दुचाकी गाड्यांवर तिघांना प्रवास करण्यास परवानगी देण्यात येईल. तसेच एका बाईकवर तीन जणांना प्रवास करण्यासाठी परवानगी देण्यासाठी सरकारकडून सहमती घेण्यात येईल. दुचाकी वाहनांवर तीन जणांची बसण्याची सोय असणाऱ्या गाड्या निर्माण करण्याची परवानगीही घेता येईल, असे कालिता म्हणाले आहेत. पण कालिता यांनी केलेले हे वक्तव्य गांभीर्याने केले की गमतीत केले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. सध्याच्या कायद्यानुसार दुचाकीवरुन तिघांनी प्रवास करणे हा कायद्याने गुन्हा आहे.