महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये युती होणार का याबद्दल राजकीय वर्तुळामध्ये चर्चा सुरु असतानाच दुसरीकडे भाजपा-मनसे पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांसाठी एकत्र आल्याचे चित्र दिसत आहे. जागांसंदर्भात दोन्ही पक्षांमध्ये महत्वाचा अंतिम निर्णय झाल्याची माहिती केंद्रीय ग्रामविकास मंत्री आणि भाजपा खासदार कपिल पाटील यांनी दिली आहे.
५ ऑक्टोबर रोजी पालघर जिल्ह्यातील १५ जिल्हा परिषद व १४ पंचायत समिती जागांसाठी निवडणूक होत आहे. सोमवारच्या या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर जिल्ह्यतील १४४ उमेदवार रिंगणात आहेत. विशेष म्हणजे अनेक ठिकाणी बहुरंगी लढती होत असून बहुतेक उमेदवारांची प्रचाराची पहिली फेरी संपली आहे. सोमवारी रात्री उशीरा कपिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना यासंदर्भातील माहिती दिली.
भाजपा-मनसेमध्ये थेट युती झाली नसली, तरी आम्ही जागांसंदर्भात चर्चा केली असून जागा व्यवस्थापनाबद्दल दोन्ही पक्षांनी समहती दर्शवली आहे. भाजपचा प्रभाव ज्या ठिकाणी जास्त आहे, तिथे मनसे उमेदवार देणार नाही आणि जिथे मनसेचा दबदबा आहे, तिथे भाजप उमेदवार देणार नसल्याचे निश्चित करण्यात आल्याचे कपिल पाटील म्हणाले आहेत. मनसेसोबत विकास आणि चांगल्या कामांसाठी जाण्यास काय हरकत आहे?, असा प्रश्न कपिल पाटील यांनी उपस्थित केला आहे.
भाजप-मनसेने ही अॅडजेस्टमेंट नक्की किती जागांवर केली आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नसून येत्या काळात हे स्पष्ट होईल, असे पाटील म्हणाले आहेत. दरम्यान पालघरचे मनसे प्रमुख अविनाश जाधव यांनी भाजप आणि मनसे एकमेकांविरोधात उमेदवार देणार नसल्याचे सांगितले आहे. पोटनिवडणुकीसाठी २१७ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले होते. छाननी प्रक्रियेदरम्यान त्यापैकी दोन अर्ज बाद ठरवण्यात आले होते. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या १५ जागांसाठी ७४, तर पंचायत समितीच्या १४ जागांसाठी ७० अर्ज कायम आहेत.