महाराष्ट्रातील कोरोनाची दुसरी लाट ही ओसरली असून बहुतांश निर्बंधांमध्ये सूट देण्यात आली. अशातच काही महत्त्वाचे सण काही दिवसांवर येऊन ठेपले आहेत. बहुतेक सर्व सुरु झाले असताना सर्वधर्मीय प्रर्थनास्थळे अद्यापही बंदच असल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी वाढत आहे. भाजपची आध्यात्मिक आघाडी मंदिरे सुरु करण्याची मागणी सातत्याने करताना दिसून येत आहे. भाजपकडून आज राज्यव्यापी शंखनाद आंदोलन करण्यात येत आहे.
भाजपच्या आंदोलनातून महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल करण्यात येत असून आता महाविकास आघाडीतील नेत्यांनी भाजपला प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. भाजपला शंखनाद आंदोलन करायचं असेल तर ते लसीकरणासाठी करावं, असा सल्ला राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिला आहे.
‘भाजपने 100 टक्के लसीकरण मिळावं यासाठी शंखनाद आंदोलन करावं. आंदोलनापेक्षा केंद्राकडून जास्तीत जास्त लसीकरण मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असा टोला सतेज पाटील यांनी लगावलाय. दरम्यान, त्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लातेबाबत देखील सूतोवाच केलं आहे. ‘ऑक्टोबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येईल,’ असे सतेज पाटील म्हणाले.