राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपविरोधी भूमिकेसाठी आग्रही असलेले मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर, यांनी आगामी निवडणुकीसाठी चक्क भाजपसोबत युती हाच पर्याय असल्याचं म्हटलं आहे. मराठा सेवा संघाच्या 32 व्या वर्धापन दिनानिमित्त लिहिलेल्या लेखात पुरुषोत्तम खेडेकर यांनी ही भूमिका मांडली. त्यामुळे भाजपला आता राज्यात नवा मित्र मिळणार असून ‘मराठा सेवा संघ’ लवकरच कमळ फुलवणार असल्याचे संकेत मिळत आहे.
संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी रेखा खेडेकर या 15 वर्ष भारतीय जनता पक्षाच्या बुलढाणा जिल्ह्यातील चिखली विधानसभा मतदारसंघातून आमदार होत्या. त्यामुळे अनेक मुद्यांवर पुरुषोत्तम खेडेकर यांची भूमिका भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विरोधात दिसत असली तरी त्यांचा भाजपसोबत नेहमीच घरोबा राहिलाय. पुरुषोत्तम खेडेकर यांनी भारतीय जनता पक्षाला युती करण्यासाठी दिलेल्या या निमंत्रणाला भाजपकडून कसा प्रतिसाद मिळतो हे पहाणं महत्त्वाच असेल.
राजकारणात शिवसेना-काँग्रेस हे कट्टर विरोधी विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊ शकतात मग इतरांना का येऊ नये? काँग्रेस-राष्ट्रवादी जर संभाजी ब्रिगेडला गृहित धरणार असेल आणि केवळ संभाजी ब्रिगेडच्या नावाचा स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी वापर करत असेल संभाजी ब्रिगेडला काही राजकीय तडजोडी करून वेगळा पर्याय शोधावा लागेल. किमान समान कार्यक्रमाप्रमाणे भाजपासोबत युती होऊ शकते असं संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते डॉ. शिवानंद भानुसे यांनी सांगितले आहे.