महाराष्ट्रातील ओबीसी जनतेस आरक्षण मिळावं म्हणून आज भाजपने संपूर्ण राज्यात एक हजार ठिकाणी जोरदार आंदोलन सुरू केलं आहे. राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच ओबीसींचं आरक्षण गेल्याचा आरोप करत भाजपने संपूर्ण महाराष्ट्र दणाणून सोडला आहे. ठाण्यापासून मुंबई-पुण्यापर्यंत आणि नागपूरपासून औरंगाबादपर्यंत भाजपचा एल्गार आज पाहायला मिळाला. नागपुरात तर भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन करण्यात आलं. यावेळी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं.
ओबीसींच्या आरक्षणाशिवाय राज्यात पाच जिल्हा परिषदा आणि पंचायत समितींसाठी निवडणुका होत आहेत. त्यामुळे ओबीसी समाज प्रचंड संतापला आहे. ठाकरे सरकारच्या निष्क्रियतेमुळेच ओबीसींचं आरक्षण गेल्याचा आरोप करत भाजपने आज राज्यात एक हजार ठिकाणी आंदोलन सुरू केलं आहे. राज्यातील अनेक भागात मोर्चे, रास्ता रोको आणि ठिय्या आंदोलन करत भाजपने निषेध नोंदवला आहे.
बावनकुळेंचं मानेवाडा चौकात ठिय्या आंदोलन
नागपुरातील मानेवाडा चौकात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात जोरदार आंदोलन करण्यात आलं. बावनकुळे यांनी थेट रस्त्यावर ठिय्या मांडत ठाकरे सरकारचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी ठाकरे सरकारवर जोरदार हल्ला चढवला. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही, तोपर्यंत ओबीसींचं आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.
सोलापुरात भाजप कार्यकर्ते-पोलिसांत झटापट
सोलापुरात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्व मंत्र्यांच्या प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले. यावेळी पोलीस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटपट झाली. भाजप जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख यांनी पुतळा जाळण्याचा आवाहन केल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुतळा जाळण्याचा प्रयत्न केल्यानंतर ही झटापट झाली.
पुण्यात जोरदार आंदोलन
पुण्यात भाजपचे ओबीसी प्रदेशाध्यक्ष योगेश टिळेकर आणि भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर हे आंदोलनात सहभागी झाले. भाजप कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याशेजारी धरणे आंदोलन करत आपला निषेध नोंदवला. यावेळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला.