राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहेत. साक्षीदार फोडण्याचाही त्यांचा प्रयत्न सुरू आहे. अशी व्यक्ती बाहेर राहणं धोकादायक असल्याने त्यांना फरार घोषित करण्यात यावं आणि त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केली आहे.
संचयनी ग्रुपकडून अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. या पार्श्वभूमीवर किरीट सोमय्या आणि आमदार नितेश राणे यांनी पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यावर चर्चा केली. त्यानंतर सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्यातील विविध घोटाळ्यांवर भाष्य केलं. यावेळी त्यांनी अनिल देशमुखांना फरार घोषित करण्याची मागणी केली. अनिल देशमुख प्रकरणात आणखी एक कलाटणी आली आहे. देशमुख बाहेर राहून पुरावे नष्ट करण्याचं काम करत आहे. साक्षीदार फोडण्याचं काम करत आहेत. परवा एक घटना घडली. सीबीआयच्या अधिकाऱ्यांना लाच देण्याचा अनिल देशमुखांच्या वकिलाने प्रयत्न केला. केला नाही दिली. त्यामुळे अशा व्यक्तिंना बाहेर ठेवणं धोकादायक आहे. म्हणून देशमुख यांना ताबडतोब फरार घोषित करा. त्यांची सर्व संपत्ती जप्त करण्यात यावी, अशी मागणी सोमय्या यांनी केली.
मुलांवरही कारवाई करा
अनिल देशमुख यांच्या कंपनीतील घोटाळ्याचा पैसा त्यांच्या मुलांच्या कंपनीत आला आहे. त्याची चौकशी करून देशमुख यांच्या मुलांवरही कारवाई करण्यात यावी. ही आमची मागणी आहे, असं ते म्हणाले.