नागपूर: उपराजधानीचे आराध्य दैवत असलेले व प्राचीन स्वयंभू श्री गणेश मंदिर टेकडी स्टेशन रोड सिताबर्डी नागपूर येथे दरवर्षी पौषातील तीळी चतुर्थी निमित्य फार मोठ्या प्रमाणावर भाविक दर्शनाला येत असल्यामुळे यात्रेचे स्वरूप प्राप्त होते. परंतु यावर्षी शासनाच्या नियमानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता 65 वर्षावरील वृध्दांनी व 18 वर्षा खालील मुलांना दर्शनास मनाई करण्यात आली आहे. प्रत्येकाला मुखमास्क वापरणे अनिवार्य आहे. सॅनिटायझरचा वापर करावा. कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक आहे. मुखमास्क नसल्यास दर्शनास प्रवेश देण्यात येणार नाही. तसेच सोबत आणलेले पूजेचे साहीत्य संकलन केंद्रावरच जमा करावे. अशी माहिती संस्थेचे सचिव संजय जोगळकर व अध्यक्ष विकास लिमये यांनी आयोजित पत्र परिषदेत दिली.
पुढे ते म्हणाले, की तीळी चतुर्थी निमित्त संस्थेतर्फे विशेष आकर्षक रोषनाई करण्यात आली असून ‘श्री’ना आकर्षक फुलांची सजावट पंकज अग्रवाल वर्धमान नगर, नागपूर यांच्यातर्फे करण्यात आली आहे. तसेच भक्तांकरीता 300 किलो रेवडीचा प्रसाद व 300 किलो तीळाचे लाडू वितरण करण्यात येणार आहे. अशावेळी कोणतीही दुर्घटना होवू नये व भाविकांना श्री चे दर्शन घेणे सुलभ व्हावे म्हणून देवस्थानातर्फे सर्व सेवा व व्यवस्था निःशुल्क पुरविणार आहे. याप्रसंगी वाहतूक पोलीस विभाग, सिताबर्डी पोलीस स्टेशन, विशेष शाखा पोलीस याचा पुरेसा बंदोबस्त व सहकार्य असेल. तसेच नागपूर महानगर पालिका, विद्युत विभाग, वैद्यकीय पथक, अग्निशामक दल, कमांडींग ऑफीसर मिल्ट्री याचेही सहकार्य लाभणार आहे.
मंगल आरती पहाटे 4 वाजता करण्यात येईल. देवस्थाना तर्फे सर्वतोपरी व्यवस्था करण्यात आली असून, यात्रेच्या प्रसंगी कोणत्याही प्रकारची दुर्घटना होवू नये करिता महिला भक्तांनी मौल्यवान वस्तू सोबत बाळगू नये. या दिवसासाठी शहरात विशेष व्यवस्था केलेली आहे. मानस चौक जयस्तंभ या दरम्यान पलॉय ओव्हर असल्यामुळे विशेष दक्षता घेणे आवश्यक आहे. मानस चौक ते श्री गणेश मंदिर या मार्गावरून जास्त भाविक येत असतात. शिवाय हा रस्ता महादेव मंदिराजवळ अरूंद झालेला आहे.
महादेव मंदिरा समोरील रिकाम्या जागेवर चप्पल जोडा स्टॅन्ड व पिण्याच्या पाण्याची व्यवस्था राहील जयस्तंभाकडून येणा-या भाविकांकरीता चप्पल, जोडा व पाणी व्यवस्था मध्य प्रदेश राज्य परीवहनच्या आवारात करण्यात आली आहे. भाविकांसाठी ई-रिक्क्षा व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांनी आपली वाहने टेकडी रोडवर ठेवावी. देवस्थानाच्या मुख्य प्रवेश द्वारापासून स्त्री पुरुष, असे दोन स्वतंत्र मार्ग राहातील. या प्रवेश द्वारा पासून बाहेर पडेपर्यंत कोणत्याही ठिकाणी दर्शनार्थीला थांबण्याची वा कॉसिंग करण्याची आवश्यकता नाही. मंदिरातील सुरक्षेच्या दृष्टीने संस्थेने सी.सी.टी.व्ही कॅमेरे लावले असून प्रवेश द्वार ते बाहेर पडण्याच्या मार्गावर क्लोज सर्कीट टि.व्ही कॅमे-यांची व्यवस्था व एल.ए.डी स्क्रीन वॉल लावण्यात आलेली आहे. याशिवाय यु.सी.एन. बी.सी.एन. इन केबल, जी.टी.पी.एल. केबल नेटवर्क या माध्यमातून प्रत्यक्ष दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे.सप्रसाद व्यवस्था बाहेर जाण्याच्या मार्गावर स्त्री पुरुषाकरीता स्वतंत्र करण्यात आली असल्याचे श्री गणेश मंदिर टेकडीतर्फे सांगण्यात आले.